GST On Insurance : राजस्थानमधील जैसलमेर येथे जीएसटी परिषदेची ५५ वी बैठक आज होत आहे. या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतर राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जीएसटी स्लॅबच्या दरात बदल होण्याची शक्यता असल्यानं त्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
जीएसटी बैठकीच्या पार्श्वभूमीवर विमा क्षेत्रात बरीच उत्सुकता आहे. आजच्या बैठकीत जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी केला जाऊ शकतो, असं अंदाज आहे. याशिवाय लक्झरी उत्पादनांवरील जीएसटी वाढवला जाऊ शकतो. तसंच, विमानाचं इंधन जीएसटीच्या स्लॅबमध्ये आणण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या सगळ्यावर आता जीएसटी परिषद काय निर्णय घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आजच्या बैठकीत जीएसटी कौन्सिलकडून एकूण १४८ विषयांवर चर्चा होणार आहे. इलेक्ट्रिक वाहने, लहान पेट्रोल आणि डिझेल वाहनांवरील जीएसटी दरात वाढ होऊ शकते. सध्या या उत्पादनांवर १२ टक्के जीएसटी भरावा लागतो. त्यात १८ टक्के वाढ करण्याची चर्चा आहे.
जीएसटी परिषदेच्या आजच्या बैठकीत टर्म लाइफ इन्शुरन्सवरील जीएसटी हटवला जाऊ शकतो. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यालाही जीएसटीतून सूट मिळू शकते. याशिवाय ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा घेणाऱ्यांनाही जीएसटीमध्ये मोठी सूट दिली जाऊ शकते.
२० लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाण्याच्या पॅक वॉटरवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणला जाऊ शकतो. त्याचबरोबर सायकलींचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणला जाऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्झरी उत्पादनांवरील जीएसटीचे दर वाढवले जाऊ शकतात. येत्या काळात २५ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घड्याळांवर १८ टक्क्यांऐवजी २८ टक्के, १५ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या शूजवर १८ टक्क्यांऐवजी २८ टक्के आणि १५०० रुपयांच्या रेडीमेड कपड्यांवर ५ टक्क्यांपर्यंत जीएसटी भरावा लागू शकतो. तर १५०० ते १० हजार रुपयांच्या रेडीमेड कपड्यांना १८ टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमध्ये आणि १० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या रेडीमेड कपड्यांना २८ टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमध्ये आणलं जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या