मराठी बातम्या  /  बिझनेस  /  onion export ban : कांद्यावरील निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही सुरूच राहणार; केंद्र सरकारचा निर्णय

onion export ban : कांद्यावरील निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही सुरूच राहणार; केंद्र सरकारचा निर्णय

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 23, 2024 06:25 PM IST

Onion Export ban news : ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर लादण्यात आलेली बंदी त्या तारखेनंतरही सुरूच ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

कांद्यावरील निर्यातबंदी सुरूच राहणार; केंद्र सरकारचा निर्णय
कांद्यावरील निर्यातबंदी सुरूच राहणार; केंद्र सरकारचा निर्णय

Onion Export ban news : कांद्याच्या निर्यातीवरील बंदी पुढील आदेशापर्यंत सुरूच राहील, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं या संदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

कांद्याच्या निर्यातीवर ३१ मार्चपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. कांद्याच्या उत्पादनात येत्या काळात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत बाजारात पुरेसा पुरवठा न झाल्यास कांद्याचे भाव कडाडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

अधिसूचनेत नेमकं काय?

विदेशी व्यापार महासंचालनालय (DGFT) हा वाणिज्य मंत्रालयाचा एक विभाग आहे. हा विभाग कांद्याच्या आयात व निर्यातीच्या संबंधातील निर्णय घेतो. या विभागानं २२ मार्च रोजी एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. '३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर असलेली बंदी पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आली आहे, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

काही बाबतींत सवलत

मंत्रिगटाच्या परवानगीनंतर काही विशेष प्रकरणांमध्ये मित्र देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी आहे. सरकारनं नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड (NCEL) मार्फत संयुक्त अरब अमिराती आणि बांगलादेशमध्ये ६४,४०० टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

कांद्याबाबत सरकारनं घेतले होते हे निर्णय

ऑक्टोबर २०२३ मध्ये केंद्र सरकारनं ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात २५ रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरानं बफर कांद्याची विक्री वाढवण्याचा निर्णय घेतला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार या वर्षी बफर स्टॉकसाठी पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचा विचार करत आहे. भाव वाढ झाल्यास ती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं गेल्या वर्षी पाच लाख टनांचा बफर स्टॉक तयार केला होता. त्यापैकी एक लाख टन अद्याप उपलब्ध आहे.

उत्पादनात घट होण्याचा अंदाज

२०२३-२४ मध्ये कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं बफर स्टॉक तयार करण्याची सरकारची योजना आहे. कृषी मंत्रालयाच्या मते, २०२३-२४ मध्ये सुमारे २५४.७३ लाख टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे, तर गेल्या वर्षी ते सुमारे ३०२.०८ लाख टन होतं. आकडेवारीनुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात कांद्याचं उत्पादन ३१६,८७ लाख टन होतं.

WhatsApp channel

विभाग