भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार विक्री करण्याच्या एलॉन मस्कच्या योजनांना केंद्राने आज जोरदार धक्का दिला आहे. परदेशातून भारतात आयात केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या आयातीवर सरकारी अनुदान किंवा टॅक्स दरात सूट देण्याबाबत केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचं आज संसदेत स्पष्ट करण्यात आलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. टेस्ला किंवा इतर कोणत्याही परदेशी कार उत्पादक कंपनीला स्थानिक मूल्यवर्धन करातून सूट देण्याचा केंद्र सरकारचा कोणता प्रस्ताव आहे का? या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात प्रकाश यांनी संसदेत ही माहिती दिली. जगातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रातील अग्रेसर कंपनी टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी भारतात आयात केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांवरील करात सूट देण्याची मागणी केली होती.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी भारतात येऊन इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्यासाठी इच्छुक असलेल्या परदेशी कार निर्मात्यांना करामध्ये सूट देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याची चर्चा होती. भारत सरकार आणि एलॉन मस्क यांच्या टेस्ला या अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीदरम्यान गेल्या एक वर्षापासून याबाबत चर्चा सुरू होती. याबाबत भारत सरकार आणि टेस्लादरम्यान सहमती झाल्याचंही बोललं जात होतं. टेस्ला कंपनीने भारतात कारखाना उघडून स्थानिक पातळीवर इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करावे, अशी केंद्रातील मोदी सरकारची इच्छा होती. तर टेस्ला कंपनीला जगात इतरत्र उत्पादित केलेल्या इलेक्ट्रिक कारची भारतीय बाजारपेठेत स्पर्धात्मक किंमतींवर विक्री करण्यासाठी आयात करात सूट हवी होती.
जून २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्यादरम्यान भेट झाली होती. पंतप्रधान मोदींनी टेस्ला कंपनीला भारतात गुंतवणूक करण्याची विनंती केली असल्याची माहिती मस्क यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली होती. टेस्ला भारतात लवकरात लवकर आपले उत्पादन सुरू करेल, असं एलॉन मस्क यावेळी म्हणाले होते.
दरम्यान, भारतात उत्पादन सुरू केल्यानंतरच्या पहिल्या दोन वर्षांच्या कालावधीत आयात केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारने १५ टक्के करात सूट देण्यास मान्यता दिली तरच टेस्ला भारतात इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करण्यासाठी कारखाना सुरू करण्यास इच्छुक असेल, असं एका वृत्तात म्हटलं आहे.