Share Market News Today : वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात आज नकारात्मक वातावरण असतानाही सरकारी कंपनी आयटीआय लिमिटेडच्या शेअरनं नवा विक्रम केला. हा शेअर रॉकेट वेगानं वधारला आणि व्यवहारादरम्यान एका क्षणी ९.३५ टक्क्यांनी वधारून ४१३.९५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअरचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. मात्र, लगेचच सुरू झालेल्या नफावसुलीमुळं दिवसअखेर हा शेअर १.९७ टक्क्यांनी वधारून ३८६ रुपयांवर बंद झाला.
आयटीआय लिमिटेडचा शेअर दोन दिवसात १८ टक्क्यांनी वधारला आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २१०.२० रुपये आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये शेअरनं हा नीचांक गाठला होता.
आयटीआय लिमिटेडच्या शेअरबाबत तज्ज्ञ फारसे आशावादी नसल्याचं चित्र आहे. एका विश्लेषकानं ३८० ते ३९० रुपयांच्या दरम्यान प्रॉफिट बुकिंग सुचवलं आहे. आनंद राठीचे वरिष्ठ व्यवस्थापक - तांत्रिक संशोधन विश्लेषक जिगर एस पटेल यांनी बिझनेस टुडेशी बोलताना आपलं मत मांडलं आहे. 'आयटीआयचा शेअर आपल्या ब्रेकआऊट पॉइंटच्या जवळ आहे. ३८० ते ३९० रुपयांवर हा शेअर विकून टाकावा, असं त्यांनी म्हटलं आहे.
आयटीआय लिमिटेडनं ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत परिचालनातून १०१६.२० कोटी रुपये उत्पन्न नोंदवलं. मागील वर्षाच्या याच तिमाहीत ते २४६.४७ कोटी रुपये होतं. आयटीआयचा तोटा सप्टेंबर तिमाहीतील १२५.८१ कोटी रुपयांवरून ७०.१० कोटी रुपयांवर आला आहे. ही कंपनी केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयांतर्गत येते. या कंपनीत सरकारचा ९० टक्के हिस्सा आहे.
अलीकडंच आयटीआय लिमिटेडनं आपल्या कंसोर्टियम पार्टनरसह भारतनेट फेज-३ प्रकल्पातील ३०२२ कोटी रुपयांच्या दोन पॅकेजेससाठी सर्वात कमी बोली (एल १) लावली होती. या करारानुसार कंपनी हिमाचल प्रदेशसाठी पॅकेट ८ आणि पश्चिम बंगाल आणि अंदमान आणि निकोबार बेटांचा समावेश करून पॅकेज ९ तयार करेल. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) द्वारे वित्तपोषित, पॅकेजेस मोठ्या निविदेचा भाग आहेत. यात देशभरातील १६ पॅकेजेसचा समावेश असून, त्यापैकी आतापर्यंत ११ पॅकेजेससाठी निविदा उघडण्यात आल्या आहेत.
आयटीआय लिमिटेडनं भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुमारे ५,४०० कोटी रुपयांचे ऑप्टिकल फायबर नेटवर्क प्रकल्प राबविले आहेत. कंपनी महानेट-१ साठी प्रकल्प अंमलबजावणी एजन्सी म्हणून काम करते आणि गुजरातमधील गुजरात फायबर ग्रिड नेटवर्क लिमिटेडसाठी दोन पॅकेजेसचं व्यवस्थापन करते.
संबंधित बातम्या