Google Layoffs: गुगल न्यूजने ४५ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Google Layoffs: गुगल न्यूजने ४५ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं

Google Layoffs: गुगल न्यूजने ४५ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं

Updated Oct 19, 2023 05:55 PM IST

Google Layoffs: गुगल कंपनीने त्यांच्या Google News विभागातील ४५ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे.

Google News Layoffs
Google News Layoffs

अमेरिकेत आयटी क्षेत्रात आलेल्या मरगळीमुळं मंदीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी या क्षेत्रातल्या नोकरकपातीचं सत्र संपताना दिसत नाहीए. अमेरिकेतील टेक क्षेत्रातली दिग्गज कंपनी Google ने या आठवड्यात त्यांच्या वृत्त विभागात (Google News) काम करणारे सुमारे ४०-४५ कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या कामगार संघटनेच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु नेमकी संख्या किती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, गुगल कंपनीने या घडामोडीवर अधिकृत माहिती सुद्धा जारी केली आहे. ‘ गुगल न्यूज हा कंपनीचा दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक भाग आहे. गुगल न्यूजमध्ये सध्या जगभरात शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीच्या या निर्णयाचा काही कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. परंतु त्यांची संख्या छोटी आहे. या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यापूर्वी त्यांचे कंपनीतच इतर विभागात पुनर्वसन होऊ शकते का, याची चाचपणी करण्यात आली होती. शिवाय प्रत्येकाला नवीन संधी शोधण्यात मदत करण्यासाठी Googleकडून नोटिस पीरिएडचा दीर्घ कालावधी, उत्तम विच्छेदन वेतन देण्यात आले आहे.’ असं गुगलच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटने गेल्या महिन्यात कंपनीतील नोकरकपातीबाबत सूतोवाच केले होते. तेव्हापासूनच गुगलमध्ये जगभरात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नोकरकपात होणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर गुगल कंपनीत भरती प्रक्रिया मंदावली होती. या वर्षाच्या सुरुवातीला फेसबूकची मूळ कंपनी असलेली मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन या बलाढ्य टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. त्यापाठोपाठ गुगलनेही कर्मचाऱ्यांमध्ये कपातीचे सत्र अवलंबले होते. जानेवारीमध्ये गुगलने जगभरातील १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते. कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६ टक्के नोकऱ्या कमी केल्या होत्या. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी त्यावेळी नोकरकपातीच्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेत नोकरी गमावलेल्या गुगलच्या कर्मचाऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली होती.

 

 

Whats_app_banner