Google Gemini : जेमिनी अ‍ॅप प्रकरण चिघळले; गुगल १० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार-google employees may face job cuts amid gemini application row ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Google Gemini : जेमिनी अ‍ॅप प्रकरण चिघळले; गुगल १० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार

Google Gemini : जेमिनी अ‍ॅप प्रकरण चिघळले; गुगल १० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार

Mar 04, 2024 05:18 PM IST

Google Gemini App row : गुगलच्या जेमिनी अॅपने केलेल्या चुकांमुळे गुगलची जगभरात बदनामी झाली आहे. परिणामी या अॅपच्या डेवलपमेंटमध्ये सामील काही निवडक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

Google layoffs: The Google logo is seen.
Google layoffs: The Google logo is seen. (Reuters)

Google Gemini App Row : गुगलच्या जेमिनी अॅपकडून यूजर्सना चुकीची माहिती दिली गेल्यामुळे गुगलची जगभरात बदनामी झाली होती. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांच्या राजीनाम्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. गुगल कंपनीने याप्रकरणी सखोल चौकशी केली आहे. आता कंपनी त्यांच्या ‘ट्रस्ट अँड सेफ्टी’ टीममधील काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार असल्याचे कळते. एकूण २५० जणांच्या टीमपैकी १० जणांवर या नोकरकपातीचा परिणाम होणार आहे.

जेमिनी अॅपच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गुगलने त्यांच्या कर्मचाऱ्यांना काही सूचना जारी केल्या आहेत. ‘अॅप टेस्टिंगसाठी आम्हाला वेळोवेळी स्वयंसेवकांची आवश्यकता असते. जलदगतीने चाचण्या करण्यासाठी याचा उपयोग होत असतो.’ असा इमेल गुगलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ट्रस्ट अँड सेफ्टी’ टीमच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, गुगलच्या अॅपमध्ये कमी चुका व्हाव्या, या उद्देशाने (Artificial Intelligence- AI) एआय उत्पादनांबाबतचे नियम तयार करण्याचे काम ‘ट्रस्ट अँड सेफ्टी’ टीमला देण्यात आले आहे. गुगलच्या जगभरातील वापरकर्त्यांसाठी ही साधने सुरक्षित आहेत का, याची खात्री करण्यासाठी ही टीम जोखीम मूल्यमापन देखील करते, असं ब्लुमबर्गच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, जेमिनी अॅपमुळे गुगलची प्रतिमा मलिन झाली होती. या चुकीबद्दल काही जणांनी सुंदर पिचाई यांचा थेट राजीनामा मागितला होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमिवर जेमिनी तयार करणाऱ्या टीमवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जेमिनी अॅप तयार करणाऱ्या टीमचे खुद्द सुंदर पिचई यांनी पूर्वी अनेकवेळा कौतुकही केले होते. जेमिनी अॅपमुळे गुगल यूजर्सना येणाऱ्या समस्या दूर होतील, अशी आशा पिचई यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, गुगलमध्ये नोकरकपातीचे नियोजन खूप आधीपासून केले गेले होते. जानेवारी २०२४च्या मध्यापासून गुगल कंपनी विविध टीमची पुनर्रचना करीत असल्याचे गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले. 'भविष्यकाळातील संधी शोधून त्यात गुगलकडून अत्यंत जबाबदारीने गुंतवणूक करण्यात येत आहे. आम्ही कंपनीचे प्राधान्यक्रम ठरवतोय. कामाच्या रचनेतून लालफितशाही हटवून कर्मचाऱ्यांना संधी उपलब्ध करून देत असल्याचे गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले.

गुगलच्या जेमिनी अॅपने केलेल्या घोडचुका

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहा आहेत का, असा प्रश्न एका यूजरने गुगलच्या 'जेमिनी' या अॅपला विचारला होता. त्यावर, 'मोदी यांची काही धोरणे हुकूमशाहीवादी आहेत', असं काही अभ्यासकांचं मत आहे,' असं उत्तर ‘जेमिनी’ अॅपकडून यूजरला मिळाले होते. याप्रकरणी केंद्रातील आयटी खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुगलला धारेवर धरले होते.