
New Hirings: जागतिक मंदीची शक्यता लक्षात घेऊन गेल्या काही महिन्यांपासून अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा सपाटा सुरु केला होता. यामध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, मेटा या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. कर्मचारी कपातीनंतर आता या कंपन्यांनी पुन्हा एकदा नोकरभरतीचे नियोजन सुरू केले आहे, मात्र या भरती प्रक्रियेतही कंपन्यांनी आपला खर्च कमी करण्याचा मार्ग शोधला आहे.
एका खाजगी अहवालानुसार, ज्या कंपन्या गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत होत्या, त्या आता इतर देशांतून कमी वेतनावर अमेरिकेत काम करणारे कर्मचारी शोधत आहेत. त्यासाठी त्यांनी एच वन बी व्हिसासाठी अर्ज केला आहे.
स्वतंत्र तपास पत्रकार ली फॅंग यांनी दिलेल्या वृत्तानुसार, यूएस डिपार्टमेंट ऑफ लेबरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार अॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, झूम, सेल्सफोर्स सारख्या कंपन्यांनी हजारो एच वन बी कामगार व्हिसासाठी अर्ज केले आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व कंपन्यांनी अलीकडेच गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. यानंतर आता कंपन्या अनेक नवीन परदेशी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
कंपन्या कमी पगारावर टेक कर्मचाऱ्यांची भरती करण्यास प्राधान्य देत आहेत. तर दुसरीकडे, जास्त पगारावर काम करणाऱ्या लोकांना कामावरून काढून टाकत आहे.
Google व्यतिरिक्त, Amazon देखील जानेवारीमध्ये १८ हजार आणि मार्चमध्ये ९ हजार कर्मचारी काढून टाकल्यानंतर कर्मचारी भरती करण्याचा विचार करत आहे. अहवालानुसार, कंपनीने एच वन बी व्हिसासाठी अनेक कमी पगार असलेल्या कामगारांसाठी अर्ज केला आहे. याशिवाय, या यादीत मायक्रोसॉफ्टचे नाव देखील समाविष्ट आहे, ज्याने अलीकडेच आपल्या एकूण कर्मचार्यांपैकी ५ टक्के म्हणजेच १० हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
संबंधित बातम्या
