Mutual Fund news : ऊठसूट लोक म्युच्युअल फंडांंमध्ये पैसे का गुंतवतायत? अवघ्या दोन महिन्यांत ८१ लाख नवी खाती सुरू
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Fund news : ऊठसूट लोक म्युच्युअल फंडांंमध्ये पैसे का गुंतवतायत? अवघ्या दोन महिन्यांत ८१ लाख नवी खाती सुरू

Mutual Fund news : ऊठसूट लोक म्युच्युअल फंडांंमध्ये पैसे का गुंतवतायत? अवघ्या दोन महिन्यांत ८१ लाख नवी खाती सुरू

Updated Jun 17, 2024 05:42 PM IST

Mutual Fund Investment News : म्युच्युअल फंड हा सध्या गुंतवणुकीचा सर्वाधिक लोकप्रिय पर्याय ठरत असून मागच्या दोन महिन्यात तब्बल ८१ लाख नवी खाती उघडण्यात आली आहेत.

म्युच्युअल फंडांकडे वाढला पैशाचा ओघ; अवघ्या दोन महिन्यांत ८१ लाख नव्या गुंतवणूकदारांनी टाकले पैसे
म्युच्युअल फंडांकडे वाढला पैशाचा ओघ; अवघ्या दोन महिन्यांत ८१ लाख नव्या गुंतवणूकदारांनी टाकले पैसे

Mutual Fund Investment News : इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या सातत्यानं वाढत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (२०२४-२५) पहिल्या दोन महिन्यांत, म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यात म्युच्युअल फंडांमध्ये ८१ लाखांहून अधिक नवीन गुंतवणूकदारांनी पैसे टाकले आहेत. या योजनांमधून मिळणारा चांगला नफा आणि भारतीय बाजारातील तेजीमुळं म्युच्युअल फंडांकडं पैशाचा ओघ येत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड खात्यांची एकूण संख्या एप्रिलमधील १८.१५ कोटींवरून मे अखेरपर्यंत १८.६ कोटींवर पोहोचली आहे. या कालावधीत एकूण ४५ लाख नवीन खाती उघडण्यात आली. मार्चमध्ये एकूण खात्यांची संख्या १७.७९ कोटी होती. एप्रिलमध्ये ३६.११ लाख नवीन खाती उघडण्यात आली. त्याचबरोबर गुंतवणुकीतही सातत्यानं विक्रमी वाढ होत आहे. आकडेवारीनुसार, इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मे २०२४ मध्ये ८४ टक्क्यांनी वाढून विक्रमी ३४,६७०.९ कोटी रुपयांवर पोहोचली. हा आकडा एप्रिलमध्ये १८,८८८ कोटी रुपये इतका होता.

डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण १६.४९ कोटी म्युच्युअल फंड खाती उघडण्यात आली. यावर्षी जानेवारी ते मे या कालावधीत २१ दशलक्षांहून अधिक खाती वाढली आहेत. या पाच महिन्यांत सुमारे १३ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे २०२४ मध्ये उघडण्यात आलेल्या नवीन खात्यांची संख्याही २०२३ च्या सरासरी मासिक आकडेवारीपेक्षा बरीच जास्त आहे. गेल्या वर्षी दरमहा सरासरी २२.३ लाख खाती उघडण्यात आली होती. यंदा दरमहा सरासरी ४० लाख खाती आहेत.

एसआयपी ठरतेय हिट

सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (SIP) माध्यमातून गुंतवणुकीचं आकर्षण वाढत आहे. एसआयपीच्या माध्यमातून मासिक गुंतवणुकीचं प्रमाण गेल्या आठ वर्षांत ६.६ पटीनं वाढलं आहे. एका अहवालानुसार, मे २०१६ मध्ये एसआयपी गुंतवणूक ३,१८९ कोटी रुपये होती. मे २०१८ मध्ये ७३०४ कोटी रुपये, मे २०२२ मध्ये १२,२८६ कोटी रुपये आणि मे २०२४ मध्ये मासिक २०,९०४ कोटी रुपये झाली. तर म्युच्युअल फंड एसआयपी खात्यांची संख्या एप्रिल २०२४ मध्ये ८.७० कोटींवर पोहोचली. ही संख्या मार्चमध्ये ८.३९ कोटी होती.

नव्या गुंतवणूकदारांमध्ये तरुणांची संख्या खूप जास्त असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्युच्युअल फंड क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी बहुतांश नवीन गुंतवणूकदार डिजिटल चॅनेलचा पर्याय निवडत आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांकडं आता ६० लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. हा आकडा बाजारातील सर्व गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीच्या एक पंचमांश आहे. त्यात म्युच्युअल फंडाच्या (एसआयपी) माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीचाही समावेश आहे.

या वर्षी दर महिन्याला उघडलेली खाती (आकडा लाखात)

जानेवारी - ४६.७

फेब्रुवारी - ४६

मार्च - ३७

एप्रिल - ३६.११

मे - ४५

…म्हणून वाढतोय म्युच्युअल फंडांकडे ओघ

 

> भारताचा आर्थिक विकासदर उच्च राहण्याची शक्यता

> परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता रस

> बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण

> जास्त जोखीम घेऊन जास्त नफा कमावण्याची प्रवृत्ती

> महागाई कमी झाली, कर्जाच्या व्याजदरात वाढ नाही

Whats_app_banner