EPF Rule News in Marathi : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आपल्या सभासदांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांसाठी ईपीएफ क्लेम सेटलमेंटवरील व्याजाच्या नियमात बदल करण्याचा निर्णय ईपीएफओनं घेतला आहे. त्याचा फायदा सदस्यांना होणार असून त्यांना अधिक व्याज मिळणार आहे.
केंद्रीय विश्वस्त मंडळानं (CBT) ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या निर्णयात ईपीएफओच्या ६० (२) (बी) मधील नियमांमध्ये बदल केला आहे. या नियमाची अंमलबजावणी झाल्यानंतर पीएफ सेटलमेंट वेगानं होणार असून सभासदांना अधिक व्याज मिळू शकणार आहे. हा नवा नियम अद्याप लागू झालेला नाही. सरकारनं अधिसूचना जारी केल्यानंतर हा नवा नियम लागू होणार आहे. तोपर्यंत, जुनाच नियम लागू राहील.
केंद्रीय विश्वस्त मंडळानं ईपीएफ योजना १९५२ च्या परिच्छेद ६० (२) (बी) मधील महत्त्वपूर्ण दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. सध्याच्या नियमानुसार, चालू महिन्याच्या २४ तारखेपर्यंत पीएफ क्लेम मिळाल्यास त्यात मागील महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत व्याज मिळतं. चालू महिन्याच्या २४ दिवसांचं मिळत नाही. मात्र, आता सभासदांना सेटलमेंटच्या तारखेपर्यंत व्याज मिळेल. यामुळं गुंतवणूकदारांना अधिक व्याज मिळेल. तसंच, पीएफ सेटलमेंटच्या प्रक्रियेला वेग येईल, असा विश्वास ईपीएफओनं व्यक्त केला आहे.
सध्या २५ तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत क्लेम सेटलमेंट केला जात नव्हता. सदस्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये हे त्यामागचं कारण होतं. पण आता महिनाभर सेटलमेंट करता येणार आहे. या निर्णयामुळं ईपीएफओची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सदस्यांप्रतीची बांधिलकी अधोरेखित होते, असं ईपीएफओनं म्हटलं आहे.
एखाद्या ईपीएफ सदस्याचे एकूण ५ लाख रुपये देय आहेत. सध्या ईपीएफचा व्याजदर ८.२५ टक्के आहे. त्यामुळं जर एखाद्या व्यक्तीचा क्लेम महिन्याच्या २३ तारखेला सेटल झाला तर नव्या नियमानुसार त्याला या २३ दिवसांचंही व्याज मिळेल. आतापर्यंत सेटलमेंटच्या एक महिन्यापूर्वीच व्याज दिलं जात होतं. ज्यामुळं ईपीएफ सदस्यांना तोटा सहन करावा लागत होता.
संबंधित बातम्या