Goldman Sachs suggestions on Yes Bank : मागच्या वर्षभरात गुंतवणूकदारांना ६० टक्क्याहून अधिक परताना देणारे येस बँकेचे शेअर विकण्याचा सल्ला विदेशी ब्रोकरेज कंपनी गोल्डमन सॅक्सनं दिला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. या संस्थेनं येस बँकेची आपली रेटिंग कमी केली असून स्टेट बँक (SBI) आणि आयसीआयसीआय (ICICI) बँकेचं रेटिंग 'बाय' वरून 'न्यूट्रल' केलं आहे.
येस बँकेचा शेअर आज आतापर्यंत एनएसईवर १.६६ टक्क्यांनी घसरला आहे. HDFC बँक किरकोळ वाढीसह १४२३.२० रुपयांवर आहे. आयसीआयसीआय बँक १०६३.८५ रुपयांवर तर, स्टेट बँक ७५९.३५ रुपयांवर आहे.
गोल्डमन सॅक्सनं एचडीएफसी बँकेवर आपलं 'बाय' रेटिंग कायम ठेवलं आहे, परंतु बजाज फायनान्सचं रेटिंग ‘सेल’वरून ‘न्यूट्रल’वर आणलं आहे. या सर्वांना बाजारातील आपला हिस्सा टिकवून ठेवण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. तसंच, नफ्याशी तडजोड करावी लागेल, असं ब्रोकरेज हाऊसनं म्हटलं आहे.
खासगी बँकांपैकी एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक लिमिटेड, इंडसइंड बँक आणि बंधन बँकेवर ब्रोकरेजनं 'बाय' रेटिंग कायम ठेवलं आहे. एसबीआयची रेटिंग गोल्डमन सॅक्सनं न्यूट्रल केली असली तरी सरकारी मालकी ५० टक्क्क्यांच्या खाली आणण्याच्या मोदी सरकारच्या संभाव्य निर्णयाबद्दल ब्रोकरेज सकारात्मक आहे.
ब्रोकरेजनं एसबीआयसाठी ७४१ रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तर, ICICI बँकेची लक्ष्य किंमत १०६८ रुपये आणि येस बँकेसाठी १६ रुपये करण्यात आली आहे. बजाज फायनान्ससाठी ६,८१५ रुपयांचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, तर HDFC बँकेचा शेअर १९१५ पर्यंत जाईल, असा अंदाज गोल्डमन सॅक्सनं वर्तवला आहे.
(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची व्यक्तिगत आहेत. त्याच्याशी हिंदुस्तान टाइम्स मराठी सहमत असेलच असं नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)