Gold Silver Price Today : येत्या शनिवारी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होत असून त्याआधी सोने व चांदीच्या भावानं उचल खाल्ली आहे. सोन्याच्या किमतींनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. दुपारी १२ वाजता प्रसिद्ध झालेल्या IBJA दरानुसार, २४ कॅरेट सोनं तोळ्याला ८१ हजार रुपयांच्या पुढं गेलं आहे. तर, चांदी ९१६०० रुपये किलो झाली आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोन्याचे वेगवेगळ्या कॅरेटचे दर जाहीर केले आहेत. त्यात GST चा समावेश नाही. त्यामुळं प्रत्यक्ष किंमतीमध्ये १ ते २ हजार रुपयांचा फरक असू शकतो.
आयबीजेएच्या दरानुसार, २३ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ८०६८२ रुपयांवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भावही ७४२०२ रुपयांवर पोहोचला असून १८ कॅरेट सोन्याचा भावही ६०,७५५ रुपयांवर पोहोचला आहे.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्यामागे ८३०२० रुपये आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव ७६,१०० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ६२२७० रुपये आहे.
चांदीचा भाव मुंबईत किलोमागे ९८,५०० रुपयांवर पोहोचला आहे. ही वाढ अशीच कायम राहिल्यास चांदी किलोमागे लाखाचा टप्पा गाठू शकते.
येत्या अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी वाढली आहे. लग्नसराईचा हंगाम असल्यानं मागणीही वाढली आहे. गेल्या वर्षी जुलैच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणलं होतं. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कपात होती आणि २०१३ नंतर पहिल्यांदाच आयात शुल्क १० रुपयांच्या खाली आलं. या कपातीनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. आता आयात शुल्कातील वाढीच्या चर्चेमुळं उलट परिणाम होत आहे.
संबंधित बातम्या