Gold Silver Price in 2023-24 : आर्थिक वर्ष २०२३-२४ संपत असताना आता आर्थिक हिशेब सुरू झाला आहे. सोन्या-चांदीच्या भावाचाही आढावा घेतला जात आहे. त्यातून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. सरत्या आर्थिक वर्षात सोन्याच्या महागाईनं चांदीवर मात केली आहे. वर्षभरात सोनं तब्बल ७५०१ रुपयांनी महागलं असून ही वाढ चांदीच्या तिप्पट आहे.
सराफा बाजारात गुरुवार, २८ मार्च रोजी सोनं ६७२५२ रुपयांच्या नवीन सार्वकालिक उच्चांकावर बंद झालं. एक वर्षापूर्वी ३१ मार्च २०२३ रोजी २४ कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत तोळ्यामागे ५९७३१ रुपये होती. म्हणजेच या कालावधीत सोन्याच्या किंमतीत ७५०१ रुपयांची वाढ झाली. तर, गेल्या वर्षभरात चांदीच्या दरात २५४५ रुपयांनी वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२३ रोजी चांदीची किंमत प्रति किलो ७१५८२ रुपये होती आणि गुरुवार, २८ मार्च २०२४ रोजी हा भाव ७२१२७ रुपये होता.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) जाहीर केलेल्या दरानुसार, गुरुवारी सोन्याचा भाव ९८४ रुपयांनी वाढून ६७२५२ रुपयांच्या नवीन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला. याउलट चांदीचा भाव केवळ ७५ रुपयांनी वाढून ७२,१२७ रुपयांवर बंद झाला.
मार्च महिन्यात सोन्यानं एकामागून एक नवा इतिहास रचला. या महिन्यात सोन्याच्या भावात सातत्यानं वाढ झाली. त्याची सुरुवात ५ मार्च रोजी झाली. या दिवशी सोन्याच्या दरानं ४ डिसेंबर २०२३ रोजीचा ६३८०५ रुपयांचा सार्वकालिक उच्चांक मोडला आणि सोनं ६४५९८ रुपयांवर पोहोचलं.
अवघ्या दोन दिवसांनंतर, ७ मार्च रोजी, सोन्याचा दर ६५०४९ वर पोहोचला. ११ मार्च रोजी ६५६४६ हजारांची मजल गाठली. १० दिवसांनंतर २१ तारखेला सोन्याचा भाव ६६९६८ रुपयांवर पोहोचला आणि २८ मार्चला सर्व विक्रम मोडत तो ६७२५२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.
एलकेपी सिक्युरिटीजच्या रिसर्च ॲनालिसिस विभागाचे उपाध्यक्ष जतिन त्रिवेदी यांच्या मतानुसार, 'व्याजदरांबाबत सकारात्मक दृष्टीकोनामुळं सोन्याच्या किमती वाढल्या होत्या, परंतु डॉलरच्या निर्देशांकात वाढ झाल्यानं सोन्याच्या दरावर पुन्हा परिणाम होऊ शकतो. चांदीची किंमत किंचित वाढून २४.५५ डॉलर प्रति औंस होती. शेवटच्या ट्रेडिंगमध्ये ती २४.५० डॉलर प्रति औंसवर बंद झाली होती.