Stock vs Gold : गुंतवणुकीचे अनेक पर्याय खुले झाल्यापासून गुंतवणुकीचा निर्णय घेताना लोकांचा मोठा गोंधळ उडू लागला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे टाकावे? बँकेत एफडी करावी? पीपीएफला प्राधान्य द्यावं की सोन्यात पैसे गुंतवावे? असे अनेक प्रश्न मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना सतावत असतात.
पीपीएफसारख्या अल्पबचत योजना आणि एफडीचे व्याजदर ठरलेले असतात. त्यामुळं त्यातील परताव्याची माहिती गुंतवणूकदारांना असते. मात्र, बाह्य घटकांवर अवलंबून असलेलं शेअर मार्केट आणि सोने या दोन पर्यायांच्या बाबतीत गुंतवणूकदार अधिक साशंक असतात. सोन्यातील गुंतवणुकीत तुलनेनं कमी जोखीम असते, तर जास्त जोखीम हे शेअर बाजारातील गुंतवणुकीचं वैशिष्ट्य असतं. मात्र, जितकी मोठी जोखीम, तितका मोठा फायदा असंही म्हणतात. पण हे प्रत्येक वेळी खरं असतं का? जास्त जोखीम असलेला शेअर बाजार प्रत्येक वेळी जास्त परताना देतो का? हाही प्रश्नच आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मागील दहा वर्षांतील दिवाळी ते दिवाळी या गुंतवणुकीचा तुलनात्मक आढावा घेतल्यास बरंच चित्र स्पष्ट होतं. सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर की शेअर बाजारातील हे कळू शकतं. बीएसई सेन्सेक्सच्या कामगिरीच्या आधारे आपल्याला याचा आढावा घेता येईल.
गेल्या वर्षी, म्हणजेच २०२२ मध्ये दिवाळी २४ ऑक्टोबरला होती. त्यावेळी १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०,५८० रुपये होता. यंदा १३ ऑक्टोबर २०२३ रोजी हाच भाव ५९,४०८ रुपयांवर स्थिरावला. यंदा दिवाळी १२ नोव्हेंबरला आहे. त्याआधीच सोन्यानं १७.४५ टक्के परतावा दिला आहे.
शेअर मार्केटच्या परताव्याबद्दल बोलायचं झाल्यास, २४ ऑक्टोबर २०२२ रोजी दिवाळीच्या दिवशी सेन्सेक्स ५९,८३१.६ वर बंद झाला होता आणि १३ ऑक्टोबर रोजी तो ६६,२८२ च्या पातळीवर होता. केडिया अॅडव्हायझरीनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दिवाळीपासून आतापर्यंत सेन्सेक्सनं १०.७८ टक्के परतावा दिला आहे. ही आकेडवारी बघता गुंतवणुकीच्या बाबतीत शेअर बाजाराच्या तुलनेत सोनं सरस ठरलं आहे.
तारीख | सोन्याचा भाव | रिटर्न्स (%) | सेन्सेक्स | रिटर्न्स (%) |
३ नोव्हेंबर २०१३ | २९८७१ | -५.८३ | २११९६ | १३.५३ |
२३ ऑक्टोबर २०१४ | २७१२५ | -९.१९ | २६८५१ | २६.६७ |
११ नोव्हेंबर २०१५ | २५४९० | -६.०३ | २५८६३ | -३.६८ |
३० ऑक्टोबर २०१६ | ३००५७ | १७.९२ | २७९३० | ७.९९ |
१९ ऑक्टोबर २०१७ | २९६७९ | -१.२६ | ३२५७२ | १६.६२ |
७ नोव्हेंबर २०१८ | ३१५८९ | ६.४४ | ३५२३७ | ८.१८ |
२७ ऑक्टोबर २०१९ | ३८२९३ | २१.२२ | ३९८३१ | १३.०४ |
१४ नोव्हेंबर २०२० | ५०९८६ | ३३.१५ | ४३६३७ | ९.५६ |
४ नोव्हेंबर २०२१ | ४७५५३ | -६.७३ | ६००६७ | ३७.६५ |
२४ ऑक्टोबर २०२२ | ५०५८० | ६.३७ | ५९८३१ | -०.३९ |
(स्त्रोत : केडिया केडिया अॅडव्हायजरी)
रशिया व युक्रेनमधील युद्ध अद्याप संपलेलं नसतानाच आता इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लोक तुलनेनं सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडं वळू शकतात. त्यातून सोन्यातील गुंतवणूक वाढेल. इस्रायल-पॅलेस्टाइन युद्ध सुरू होण्याआधी सोन्याच्या किंमतींचा अंदाज वेगळा होता. दिवाळीपर्यंत सोन्याची देशांतर्गत किंमत प्रति तोळा ६२ हजार रुपयांपेक्षा जास्त राहील असा अंदाज होता. मधल्या काळात घसरल्यानंतर आता पुन्हा सोन्याचे दर वाढू लागले आहेत. अशा परिस्थितीत या दिवाळीपर्यंत सोन्याची स्पॉट किंमत ६० ते ६१ हजारमध्ये राहू शकते, असा अंदाज केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांनी वर्तवला आहे.
संबंधित बातम्या