आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात वाढ होण्यामागे अमेरिकन फेड रिझर्व्हने व्याजदरात केलेली कपात कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. येत्या काळात व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. याशिवाय इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील वाढलेल्या तणावाचाही परिणाम सोन्याच्या किंमतींवर होत आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून जगातील मध्यवर्ती बँकेकडून सातत्याने होत असलेली सोन्याची खरेदी हेही भाववाढीला कारणीभूत आहे. सोन्याच्या बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही वर्षांत सोन्याचे दर एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडतील, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
26 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2685.42 डॉलर प्रति औंसवर पोहोचला होता. तर एमसीएक्सवर मुंबईत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 75,750 रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला फेड रिझर्व्हने व्याजदरात ५० बेसिस पॉईंट्सची कपात केली होती. गेल्या 4 वर्षात फेड रिझर्व्हने पहिल्यांदाच व्याजदरात कपात केली. या कपातीनंतर व्याजदर ४.७५ ते ५ टक्क्यांच्या घरात आला आहे. डॉलर कमकुवत झाल्याचा फायदा सोन्याला मिळत आहे. जाणकारांच्या मते, डॉलर कमकुवत झाल्यास सोन्याच्या दरात नक्कीच वाढ दिसून येईल.
तज्ज्ञांच्या मते, विकासदरातील घसरण आणि अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केलेली कपात यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित आश्रय शोधतात. अशा परिस्थितीत सोन्यापेक्षा चांगला पर्याय कोणता असेल. अमेरिकेव्यतिरिक्त इस्रायल-हिजबुल्ला वाद आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात अस्थिरतेचे वातावरण आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहेत.
मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. यामागचे कारण म्हणजे ते आपल्या परकीय चलन साठ्यातील डॉलरचा वाटा कमी करू शकतात. रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने २०२२ मध्ये घातलेली बंदी हे या रणनीतीचे कारण होते. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, कोटक सिक्युरिटीजचे अनिंद्य बॅनर्जी म्हणतात की, पुढील 4 वर्षात सोन्याचा भाव 4000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,10,000 रुपयांच्या पातळीवर पोहोचेल.