Akshaya Tritiya Investment : हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. या दिवशी काही ना काही खरेदी करण्याकडं लोकांचा कल असतो. विशेषत: बहुतेक लोक सोन्याचे दागिने खरेदी करतात. या दिवशी केलेली गुंतवणूक अक्षय्य राहते. ती वाढत राहते, असं मानतात. मात्र, अक्षय तृतीयेच्या गुंतवणुकीसाठी सोने हा एकमेव पर्याय नाही. त्या व्यतिरिक्तही अनेक पर्याय आहेत.
गुंतवणूक विश्वातील जाणकारांकडून जाणून घेऊया सोन्यातील गुंतवणुकीचे विविध पर्याय…
Acube Ventures चे संचालक आशिष अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, 'डिजिटल सोनं हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सोनं खरेदी करू शकता आणि ते ऑनलाइन स्टोअर करू शकता. हे सोपे, सुरक्षित आणि पारदर्शक आहे. सोन्याच्या खाणीशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही याकडं एक उत्तम पर्याय म्हणून पाहू शकता. याशिवाय गोल्ड ईटीएफ (Gold ETF) आणि सुवर्ण सार्वभौम रोखे (Sovereign Gold Bonds) हेही पर्याय आहेत. प्रत्यक्ष सोने जवळ बाळगण्याची जोखीम या पर्यायांमुळं कमी होते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं देखील शुभ ठरू शकतं. गोयल गंगा डेव्हलपमेंटचे संचालक गुंजन गोयल सांगतात की, अनेक भारतीय घर खरेदी करण्यासाठी पैशांची बचत करतात. घरातील गुंतवणूक ही केवळ गुंतवणूक नसून ते स्थिरता आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे. ठिकाण, सोयीसुविधा, विकासकाची विश्वसनीयता आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता यासारखे घटक जुळून आल्यास रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं अर्थपूर्ण ठरतं.
सराफ फर्निचरचे संस्थापक आणि सीईओ रघुनंदन सराफ यांच्या मते, अक्षय तृतीया हा नवीन सुरुवात करण्यासाठी एक शुभ मुहूर्त आहे. त्यामुळं तुमच्या घरात नवीन आणि ट्रेंडिंग फर्निचर आणण्याची हीच योग्य वेळ आहे. फर्निचरची खरेदी करताना किमान देखभाल, टिकाऊपणा आणि स्थिरता या बाबी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
मोतिया समूहाचे संचालक एल. सी. मित्तल म्हणाले की, अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे. कारण हा मुहूर्त भाग्योदय, सुखी-समृद्ध जीवन आणि शांतता घेऊन येतो असं मानलं जातं.