Gensol Engineering Share Price : शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची आणि संयमाची परीक्षा घेणारी असते. मात्र, नीट अभ्यास करून आणि बाजारातील चढउतारांवर लक्ष ठेवून योग्य कंपनी निवडल्यास ही गुंतवणूक नशीब बदलून टाकणारी ठरू शकते. जेनसोल इंजिनीअरिंगच्या गुंतवणूकदारांना सध्या असाच अनुभव येत आहे.
जेनसोल इंजिनिअरिंग या कंपनीच्या शेअर्समध्ये वाऱ्याच्या वेगानं वाढ झाली आहे. मागच्या अवघ्या ३ वर्षांत या कंपनीचे शेअर्स ७,००० टक्क्यांनी वाढले आहेत. तीन वर्षांपूर्वी १८ रुपयांवर असलेला हा शेअर आज १३०० रुपयांच्याही वर पोहोचला आहे. याशिवाय, कंपनीनं ३ वर्षांत दोनदा बोनस शेअर्स दिले आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारांची अक्षरश: चांदी झाली आहे.
बोनस शेअर्सचे आकडे जमेस धरता जेनसोल इंजिनिअरिंगच्या शेअर्सनं अवघ्या ३ वर्षांत १ लाख रुपयांच्या बदल्यात २ कोटी रुपयांपेक्षाही जास्त परतावा दिला आहे. आज, २० फेब्रुवारी २०२४ रोजी जेनसोलचे शेअर्स १३३१.१० रुपयांवर बंद झाले.
साधारण तीन वर्षांपूर्वी, १२ फेब्रुवारी २०२१ रोजी जेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स १८.७५ रुपयांवर होते. त्यावेळी एखाद्या व्यक्तीनं कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवलेले असतील तर त्याला त्या पैशात ५३३३ शेअर्स मिळाले असतील. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये कंपनीनं १:३ च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. तर, ऑक्टोबर २०२३ मध्ये २:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. दोनदा मिळालेल्या या बोनस शेअर्सची बेरीज केल्यास आज संबंधित व्यक्तीकडं एकूण २१,३३० शेअर्स असतील. जेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स आज १३३१.१० रुपयांवर बंद झाले. सध्याच्या शेअर्सच्या किमतीनुसार २१,३३३ शेअर्सची किंमत २.८३ कोटी रुपये इतकी आहे.
गेल्या एका वर्षात जेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स ३२१ टक्क्यांनी वाढले आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ३१६.८८ रुपयांवरून १३३१.१० रुपयांपर्यंत वाढले आहेत. मागच्या अवघ्या ६ महिन्यांत जेनसोल इंजिनीअरिंगच्या समभागांनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये १२८ टक्के वाढ झाली आहे. तर, मागच्या एका महिन्यात जेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स ५० टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीच्या समभागांची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १३७७.१० रुपये आहे. तर, ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २६५.४२ रुपये आहे.
(डिसक्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)