मोठी बातमी! दिग्गज उद्योगपती गौतम अदानी लवकरच निवृत्त होणार; कोण असेल साम्राज्याचा वारसदार?-gautam adani to step down from adani group in the 2030s who gets control ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  मोठी बातमी! दिग्गज उद्योगपती गौतम अदानी लवकरच निवृत्त होणार; कोण असेल साम्राज्याचा वारसदार?

मोठी बातमी! दिग्गज उद्योगपती गौतम अदानी लवकरच निवृत्त होणार; कोण असेल साम्राज्याचा वारसदार?

Aug 05, 2024 12:17 PM IST

अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी (वय ६२) यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अब्जावधी रुपयांच्या साम्राज्यात आपल्या उत्तराधिकाराची योजना सांगितली.

गौतम अदानी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त होणार; कोणाकडे सोपवणार उद्योग समूहाची धुरा?
गौतम अदानी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त होणार; कोणाकडे सोपवणार उद्योग समूहाची धुरा? (Reuters)

Gautam Adani Retirement Plan : अदानी समूहाचे सर्वेसर्वा व भारतातील एक चर्चेतील उद्योगपती गौतम अदानी यांनी मोठी बातमी दिली आहे. वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळं उद्योग वर्तुळात अदानी समूहाच्या वारसदाराच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

'ब्लूमबर्ग'शी बोलताना अदानी यांनी ही माहिती दिली आहे. व्यवसाय टिकवायचा असेल तर योग्य उत्तराधिकारी असणं खूप महत्त्वाचं आहे. मी ही निवड दुसऱ्या पिढीवर सोपवली आहे. जेणेकरून बदलाची ही प्रक्रिया हळुवार आणि अतिशय पद्धतशीर व्हावी, असं अदानी यांनी ब्लूमबर्गला सांगितलं.

कोणाची नावं चर्चेत?

आपल्या अब्जावधींच्या साम्राज्याची धुरा कोणाकडं असेल याची रूपरेषाही त्यांनी सांगितली. गौतम अदानी यांची मुलं करण (३७), जीत (२६) आणि त्यांचे चुलत भाऊ प्रणव (४५) आणि सागर (३०) अदानी यांची नावं फॅमिली ट्रस्टच्या माध्यमातून वारसदार म्हणून देण्यात आली आहेत.

अदानी निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वारसदार जीत, करण, प्रणव आणि सागर हे अदानी समूहाच्या कौटुंबिक ट्रस्टचे समान लाभार्थी होतील. समूहातील विविध कंपन्यांच्या समभागांचे हस्तांतरण गोपनीय कराराद्वारे केलं जाईल, असं ब्लूमबर्गने या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. अदानी समूहानं या प्रश्नांना उत्तर दिलं नाही, असं रॉयटर्सनं म्हटलं आहे.

कोणाला काय मिळू शकते?

अदानी यांचा मोठा मुलगा करण सध्या अदानी पोर्ट्सचा व्यवस्थापकीय संचालक आहे, तर धाकटा जीत अदानी विमानतळाचा संचालक आहे, पुतण्या प्रणव अदानी एन्टरप्रायझेसचा संचालक आहे आणि पुतण्या सागर अदानी ग्रीन एनर्जीचा कार्यकारी संचालक आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भविष्यात रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी प्रणव आणि करण हे सर्वाधिक संभाव्य उमेदवार आहेत. संकटाच्या काळात किंवा धोरणात्मक निर्णय संयुक्तपणे घेतले जातील, असं ब्लूमबर्गला दिलेल्या स्वतंत्र मुलाखतीत गौतम अदानी यांचे संभाव्य वारसदार प्रवण यांनी सांगितलं.

सामूहिक निर्णय घेण्याच्या आव्हानाविषयी विचारलेले प्रश्न त्यांनी टाळले. आम्ही प्रत्येकजण वेगवेगळे व्यवसाय पाहत असलो तरी आम्ही एक टीम आहोत. मुख्यालयात असलेले कुटुंबीय दररोज एकत्र जेवतात, जिथं दैनंदिन अडचणींवर चर्चा होते, असं प्रणव यांनी स्पष्ट केलं.

असा आहे अदानींच्या साम्राज्याचा विस्तार

ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सनुसार (BBI) मुकेश अंबानी यांच्यानंतर अदानी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची संपत्ती १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.

समूहातील प्रमुख कंपनी अदानी एन्टरप्रायजेसनं गेल्या आठवड्यात आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. नवीन ऊर्जा व्यवसायातील विस्तार आणि नुतनीकृत ऊर्जेमध्ये वाढलेल्या गुंतवणुकीमुळं कंपनीला वार्षिक दुप्पट नफा झाला.

अदानी समूहाचे एकूण बाजार भांडवल २१३ अब्ज डॉलर असून पायाभूत सुविधा व्यवसाय, बंदरे, शिपिंग, सिमेंट आणि सौर ऊर्जा क्षेत्रात १० सूचीबद्ध कंपन्या आहेत.

गौतम अदानी यांचं उत्तराधिकारी ठरवण्याचं मॉडेल अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या प्रमाणेच आहे. अर्नाल्ट यांच्या पाच मुलांपैकी प्रत्येकाचा नव्या होल्डिंग कंपनीत समान हिस्सा आहे. अदानींप्रमाणे अरनॉल्ट यांनीही त्यांच्या जागी अध्यक्षपदी कोण विराजमान होईल, हे सांगितलेलं नाही.

(रॉयटर्स आणि ब्लूमबर्गच्या इनपुटसह)