Share Market News In Marathi : नव्या वर्षाची सुरुवात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सुखद बातम्यांनी होत आहे. अनेक कंपन्या बोनस शेअर जाहीर करत आहेत. यात आता गरवारे टेक्निकल फायबर्स या टेक्सटाइल कंपनीची भर पडली आहे.
गरवारे टेक्निकल फायबर्स ४:१ या प्रमाणात बोनस शेअर्सचं वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक एका शेअरमागे ४ बोनस शेअर्स देत आहे. त्यासाठी शुक्रवार, ३ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. याचाच अर्थ, या तारखेला ज्यांच्या डीमॅट अकाऊंटमध्ये शेअर असतील, तेच शेअरहोल्डर्स बोनस शेअर्ससाठी पात्र ठरतील.
गरवारे टेक्निकल फायबर्स पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देत आहे. कंपनीनं २०२१ पासून १६ रुपये लाभांश दिला आहे. तसंच, कंपनीनं २०२४ च्या सुरुवातीला शेअर्स बायबॅक केले आहेत. गरवारे टेक्निकल फायबर्सनं गेल्या वर्षी २६ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान शेअर्सची पुनर्खरेदी केली होती. कंपनीनं ३८०० रुपये प्रति शेअर दरानं शेअर बायबॅक केले होते.
गरवारे टेक्निकल फायबर्सचे समभाग गेल्या ११ वर्षांत ८४०५ टक्क्यांनी वधारले आहेत. ३ जानेवारी २०१४ रोजी कंपनीचा शेअर ५५ रुपयांवर होता. आज तोच शेअर बीएसईवर ४६७६.०५ रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या ५ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये २८१ टक्क्यांची वाढ झाली आहे. गरवारे टेक्निकल फायबर्सचा शेअर ३ जानेवारी २०२० रोजी १२२६.८० रुपयांवर व्यवहार करत होता. आज हा शेअर ४६७६.०५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात वस्त्रोद्योगाशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचं मार्केट कॅपही ९२७० कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे.
गरवारे टेक्निकल फायबर्सचा शेअर गुरुवारी बीएसईवर ४६७६.०५ रुपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४९२५.८० रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३११६.१० रुपये आहे.
संबंधित बातम्या