Share Market news Updates : गाला प्रिसिजन इंजिनीअरिंगचा आयपीओ आज सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. येत्या बुधवारपर्यंत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. या आयपीओसाठी प्रत्येक शेअरमागे ५०३ ते ५२९ रुपये असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
डिस्क अँड स्ट्रिप स्प्रिंग्स, कॉइल अँड सर्पिल स्प्रिंग्ज आणि स्पेशल फास्टिंग सोल्यूशन यांसारख्या स्पेशलाइज्ड स्प्रिंग्जसाठी लागणाऱ्या पार्ट्सची निर्मिती करणाऱ्या गाला प्रिसिजन इंजिनीअरिंगमध्ये अँकर गुंतवणूकदारांनी ५०.२९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आयपीओच्या एका लॉटमध्ये २८ इक्विटी शेअर्स मिळणार आहेत.
गाला प्रिसिजन इंजिनीअरिंगनं पब्लिक इश्यूमधील ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), १५ टक्के शेअर्स नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी (NII)आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के शेअर राखीव ठेवले आहेत.
बीएसईच्या आकडेवारीनुसार, सकाळी ११.४५ मिनिटांपर्यंत गाला प्रिसिजन इंजिनीअरिंगचा आयपीओ आज सब्सक्रिप्शनच्या पहिल्या दिवशी २.७२ पट सब्सक्राइब झाला आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या शेअर विक्रीत २२,२३,८३० शेअर्सच्या तुलनेत ६०,४४,०८० शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती.
किरकोळ गुंतवणुकदारांच्या श्रेणीत आयपीओला ३.८२ पट तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत ३.६२ पट सब्सक्रिप्शन मिळालं. कर्मचारी श्रेणीत हा आयपीओ १४.७७ पट सबस्क्राइब झाला आहे.
चॉइस इक्विटी ब्रोकिंगनुसार, ही कंपनी तळागाळातील ग्राहकांशी संबंधित असलेल्या अक्षय ऊर्जा, औद्योगिक आणि रेल्वेमार्गांसारख्या उद्योगांना सेवा पुरवते. या उद्योगांकडून मागणीत सतत वाढ अपेक्षित आहे. त्यामुळं चॉइस ब्रोकिंगनं आयपीओ 'सबस्क्राइब' करण्याचा सल्ला दिला आहे.
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडच्या मूल्यांकनानुसार, कंपनीची महसूल वाढ मजबूत आणि स्थिर आहे. नफ्यात किरकोळ चढ-उतार झाले असले तरी एकंदर आर्थिक कामगिरी अजूनही सकारात्मक आहे. आयपीओचं मूल्यांकन उद्योगाच्या निकषांशी सुसंगत आहे. सध्याचा बाजाराचा कल आणि मागणी लक्षात घेता कंपनी सुस्थितीत आहे.
investorgain.com नुसार गाला प्रिसिजन इंजिनीअरिंग आयपीओ ग्रे मार्केटमध्ये २४० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. हे लक्षात घेता कंपनीच्या आयपीओची लिस्टिंग किंमत ७६९ रुपये राहील, असा अंदाज आहे.
गाला प्रिसिजन इंजिनीअरिंग कंपनीचे जगभरात १७५ हून अधिक सक्रिय ग्राहक आहेत. यात वेस्टास विंड टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एनरेकॉन जीएमबीएच, जीई इंडिया इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड, अल्ट्रा इंडस्ट्रियल मोशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. एल अँड टी इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन प्रॉडक्ट्स, श्नाइडर इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, वुर्थ इंडस्ट्रियल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बुफॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, शेफ्लर इंडिया लिमिटेड, ब्रेम्बो ब्रेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हिताची अस्तेमो चेन्नई प्रायव्हेट लिमिटेड, एक्झेडी क्लच इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एंड्युरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडसारख्या ग्राहकांना ही कंपनी सेवा पुरवते. रेल्वे उद्योगाला देखील ही कंपनी सेवा पुरवते.
२०२३-२०२४ या आर्थिक वर्षात कंपनीचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू २०२.५४ कोटी रुपये होता, तर करोत्तर नफा २२.३३ कोटी रुपये होता.