TRAI news rule for spam calls : तुम्ही स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहात का ? जर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. स्पॅम कॉलची समस्या सोडवण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मोठा निर्णय घेतला आहे. मोठ्या प्रमाणात कनेक्शनचा गैरवापर करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध आता कठोर कारवाई केली जाणार आहे. टेलिकॉम ऑपरेटर कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल यांना पीआरआय किंवा एसआयपी कनेक्शनद्वारे स्पॅम कॉल करणाऱ्या कोणत्याही कंपनीच्या सेवा आता बंद कराव्या लागणार आहेत.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) या बाबत नवी नियमावली लागू केली आहे. १ सप्टेंबर पासून ही नवी नियमावली लागू केली जाणार आहे. स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे किंवा सर्व ऑपरेटर्सवर दोन वर्षांपर्यंत बंदी घातली जाणार आहे. ट्रायने स्पॅम कॉल्सची समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. अनावश्यक कॉलमुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढत आहे. दूरसंचार सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांसोबत (टीएसपी) या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि या कठोर नियमांना अंतिम रूप देण्यासाठी नुकतीच ट्रायने बैठक देखील घेतली आहे.
ट्रायने या बाबत चेतावणी दिली आहे. टीएसपीच्या माध्यमातून ही माहिती इतर सर्व टीएसपीद्वारे सार्वजनिक केली जाणार आहे. नव्या नियमावलीचे पालन न करणाऱ्या कंपन्यांच्या सर्व दूरसंचार सेवा खंडित करून अशा प्रकारच्या सेवा देणारया कंपन्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी ब्लॅकलिस्ट केल्या जाणार आहेत.
स्पॅम कॉल्सवर कारवाई करण्याबाबत ट्रायने आदेश दिले आहेत की अनवेरिफाइड यूआरएल व एपीके मेसेज १ सप्टेंबर पासून ब्लॉक केले जातील. दूरसंचार कंपन्यांना मेसेज फ्लो शोधण्यासाठी नवी यंत्रणा लागू करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मेसेज कुठून येतात हे शोधण्यासाठी नव्या नियमावली सोबतच टेलीमार्केटर चेन बाइंडिंगची तांत्रिक अंमलबजावणी टीएसयूपीद्वारे ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल असे ट्रायने म्हटलं आहे. व्हॉईस कॉल्स/रोबो कॉल्स/प्री-रेकॉर्ड केलेल्या कॉल्ससाठी पीआरआय/एसआयपी कनेक्शन वापरणाऱ्या स्पॅमर्सवर कठोर कारवाई करण्याची तातडीची गरज असल्याचेही ट्रायने म्हटले आहे. टेलिकॉम कंपन्यांनी स्पॅम कॉलच्या समस्येला आळा घालण्यासाठी ट्रायला पूर्ण सहकार्य करावे व ट्रायने लागू केलेल्या नियमांचे व सूंचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
ट्रायने स्पष्ट केले की ते कोणतेही फसवणूक करणारे स्पॅम कॉल्स खपवून घेतले जाणार नाहीत. त्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. टेलिकोप कंपन्या या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी ट्रायला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ट्रायच्या या नव्या नियमावलीमुळे ग्राहकांची डोकेदुखी कमी होणार आहे.