Tribute to Ratan Tata : रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला दुख: झालं आहे. सर्वसामान्य नागरिक, राजकीय नेते, अभिनेते प्रत्येकजण या महान उद्योगपतीला श्रद्धांजली वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांच्या भेटीचे काही फोटो ट्वीट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. मोदी म्हणाले, ‘रतन टाटा हे एक दूरदर्शी उद्योजक, एक दयाळू आत्मा व विलक्षण प्रतिभा असलेले व्यक्तीमत्व होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व प्रदान केलं. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याच्या त्यांच्या धडपडीने त्यांनी अनेकांच्या मनात घर केलं आहे. रतन टाटा यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आणि परत देण्याची त्यांची आवड. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यासारख्या अनेक क्षेत्रात त्यांनी भरवी काम केले, असे मोदी म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील एक्सवर पोस्ट करत रतन टाटा यांना आदरांजली वाहली आहे. श्री रतन टाटा यांच्या दुःखद निधनाने, भारताच्या उद्योग विश्वाला मोठा धक्का बावसला आहे. टाटा यांचे राष्ट्र उभारणीत मोठे योगदान आहे. त्यांच्या नैतिकतेसह उत्कृष्टतेचे मिश्रण करणारा एक आयकॉन भारताने गमावला आहे. पद्मविभूषण आणि पद्मभूषण मिळवणारे, टाटांचा महान वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या रतन टाटा यांनी जागतिक स्तरावर स्वत:ची आणि देशाची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यांनी अनुभवी व्यावसायिक आणि तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. परोपकार आणि परोपकारासाठी त्यांचे योगदान अमूल्य असून त्यांच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना माझ्या संवेदना व्यक्त करते असे लिहीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले, महान उद्योगपती टाटा यांनी नि:स्वार्थपणे आपले जीवन आपल्या देशाच्या विकासासाठी समर्पित केले. जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा त्यांचा उत्साह आणि भारत आणि तेथील लोकांच्या भल्यासाठी ची बांधिलकी पाहून मी आश्चर्यचकित झालो.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, रतन टाटा दूरदृष्टी होते. व्यवसाय आणि परोपकार या दोन्हींवर त्यांनी अमिट ठसा उमटवला आहे. त्यांचे कुटुंबीय आणि टाटा समुदायाप्रती माझी संवेदना आहे.
रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, टाटा यांची नम्रता, साधेपणा आणि सर्वांप्रती आदर आपण पाहिला, मग ते कोणतेही असोत. त्यांच्याकडून मी जे शिकलो ते माझ्या आयुष्यात कायम प्रतिबिंबित होईल. त्यांच्या जाण्याने आपल्या देशाचे मोठे नुकसान झाले असून सर्वांना अतीव दु:ख झाले आहे. आपण एक दूरदर्शी आणि दयाळू मार्गदर्शक गमावला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील शरद पवार यांना श्रद्धांजलि आणि आदरांजली वाहिली आहे. रतन टाटा यांच्या निधनावर त्यांनी शोक व्यक्त केला असून जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील असे पवार यांनी म्हटलं आहे. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे म्हणत शरद पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भारतीय उद्योग जगताचे पितामह आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जमशेदजी टाटा यांनी दीडशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या टाटा साम्राज्याचे रतन टाटा हे मुकुटमणी होते. आधुनिक व्यवस्थापकीय तत्त्वांचा अंगीकार करताना रतन टाटा यांनी समूह संस्थापकांच्या दृष्टिकोनाबाबत कधीही तडजोड न करता टाटा समूहाला एक विश्वसनीय भारतीय जागतिक ब्रांड म्हणून प्रस्थापित केले. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन टाटा समूहाने आपल्या उत्पादन व सेवेच्या माध्यामातून स्पर्शले, याचे श्रेय जसे टाटा समूहाचे आहे, तसेच ते रतन टाटा यांच्या व्यापक दृष्टीचे देखील आहे.
निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मीळ मिलाफ अमुल्य असे रत्न म्हणता येईल असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने गमावले आहे. भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू अस्ताला जाणे धक्कादायक आहे.अशी शोकमग्न प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“उद्योगपती रतन टाटा हे भारतीय उद्योगक्षेत्राचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा होते. टाटा उद्योगसमुहाला आंतरराष्ट्रीय उंची, सन्मान, प्रतिष्ठा, विश्वासार्हता मिळवून देतांना देशाचा गौरव वाढवण्याचं काम त्यांनी केलं. सचोटी, प्रामाणिकपणाने उद्योग क्षेत्रात यश मिळवता येतं हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखवलं. संकटकाळात देशवासियांच्या मदतीला धावून येणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योगसमुह म्हणून टाटा उद्योगसमुहाला देशभक्तीचं प्रतिक बनवण्यात ते यशस्वी ठरले. सर्वसामान्य भारतीयांचं कारचं स्वप्न त्यांनी ‘नॅनो’ कारच्या माध्यमातून पूर्ण केलं. टाटा उद्योगसमुहाचे संस्थापक नुसेरवानजी, जमशेटजी टाटा यांचा उद्योग, व्यापार, सामाजिक कार्य, देशभक्तीचा वारसा त्यांनी यशस्वीपणे पुढे नेला. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान निर्माण करणाऱ्या रतन टाटा साहेबांचं निधन ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी आहे. टाटा परिवार आणि रतन टाटा साहेबांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रतन टाटा साहेबांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
संरक्षण मंत्री, राजनाथ सिंह म्हणाले, रतन टाटा यांच्या निधनाने सर्व देश दु:खी झाला आहे. ते भारतीय उद्योगातील एक दिग्गज होते. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.
कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आपण भारताचा एक अमूल्य सुपुत्र गमावला आहे. रतन टाटा एक उत्कृष्ट दानशूर व्यक्ती होते. सर्वसमावेशक विकास आणि भारताच्या प्रगतीसाठी त्यांची बांधिलकी सर्वोपरि होती. टाटा हे सचोटी आणि नैतिक नेतृत्वाचे पर्याय होते. ते लाखो लोकांचे प्रेरणास्थान होते, असे खरगे म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, काँग्रेस अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष हे भारतीय उद्योगाचे प्रणेते आणि परोपकारी होते. त्यांच्या जाण्याने भारतीय व्यवसाय आणि समाजाची कधीही भरून न निघणारी हानी होईल.
संबंधित बातम्या