पेट्रोल-डिझेल, सिलिंडरसह अनेक गोष्टी आजपासून महाग, अनेक नियमांत बदल! जाणून घ्या सविस्तर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  पेट्रोल-डिझेल, सिलिंडरसह अनेक गोष्टी आजपासून महाग, अनेक नियमांत बदल! जाणून घ्या सविस्तर

पेट्रोल-डिझेल, सिलिंडरसह अनेक गोष्टी आजपासून महाग, अनेक नियमांत बदल! जाणून घ्या सविस्तर

HT Marathi Desk HT Marathi
Nov 01, 2024 10:19 AM IST

New Rules from Today : आज, १ नोव्हेंबरपासून देशभरात पेट्रोल, डिझेल, आणि सिलिंडरच्या दरात वाढ होणार आहे. तसंच, रेल्वे तिकीट बुकिंगसह इतर अनेक नियम बदलणार आहेत.

पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार, क्रेडिट कार्ड सेवा महागणार, आजपासून बरंच काही बदलणार, पाहा यादी
पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार, क्रेडिट कार्ड सेवा महागणार, आजपासून बरंच काही बदलणार, पाहा यादी

Petrol Diesel Price : १ नोव्हेंबर २०२४ पासून म्हणजेच आजपासून अनेक नियम आणि शुल्कांमध्ये बदल होत असून त्याचा थेट परिणाम देशातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, व्यावसायिक सिलिंडरची दरवाढ आणि एसबीआय क्रेडिट कार्ड शुल्क व इतर बदलांचा समावेश आहे. रेल्वेच्या आगाऊ तिकिटांच्या बुकिंगसंदर्भातील नियमांतही बदल होणार आहे.

तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ६२ रुपयांनी वाढ झाली असून दिल्लीतील किरकोळ किंमत १८०२ रुपये झाली आहे. तसेच ५ किलोच्या एफटीएल सिलिंडरच्या दरात ही १५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, १४.२ किलोच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

१ नोव्हेंबरपासून एसबीआयच्या असुरक्षित क्रेडिट कार्डच्या फायनान्स चार्जेसमध्ये दरमहा ३.७५ टक्के वाढ होणार आहे. याव्यतिरिक्त, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त युटिलिटी पेमेंटवर १ टक्के नवीन शुल्क १ डिसेंबर २०२४ पासून लागू होईल.

आयसीआयसीआय बँकेनंही क्रेडिट कार्ड शुल्क रचना आणि बक्षीस कार्यक्रमात बदल केले आहेत. त्याचा विमा, किराणा खरेदी आणि विमानतळ लाउंज वापरासह विविध सेवांवर होईल. हे बदल १५ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होतील आणि स्पा बेनिफिट्स बंद करणे, १ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चासाठी इंधन अधिभार सूट काढून टाकणे आणि विलंब देयक शुल्कात समायोजन यांचा समावेश आहे.

देशांतर्गत पैशांच्या हस्तांतरणासाठी आरबीआयची नवी मार्गदर्शक तत्त्वे देखील १ नोव्हेंबरपासून लागू होतील. देशांतर्गत पैशांच्या हस्तांतरणाची सुरक्षा वाढविणे आणि अद्ययावत आर्थिक नियमांचं पालन सुनिश्चित करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.

रेल्वे तिकीट आरक्षण

भारतीय रेल्वेनं रेल्वे तिकिटांच्या आगाऊ बुकिंगचा कालावधी कमी करण्याची घोषणा केली आहे. पूर्वीच्या १२० दिवसांऐवजी आता ६० दिवसांपर्यंत मर्यादित असेल. हा नियम १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होणार आहे, परंतु ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट आरक्षित केलं आहे त्यांना याचा फटका बसणार नाही.

इंडियन बँकेच्या एफडी विषयी

आकर्षक व्याजदर देणाऱ्या इंडियन बँकेच्या विशेष मुदत ठेव योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांना ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंतमुदत आहे. सर्वसामान्यांसाठी ७.०५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.५५ टक्के आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ७.८० टक्के रक्कम ३०० दिवसांच्या ठेवीवर बँक उपलब्ध करून देणार आहे. ४०० दिवसांच्या कालावधीसाठी हे दर अनुक्रमे ७.२५ टक्के, ७७५ टक्के आणि ८ टक्के आहेत. बँकेच्या वेबसाईटनुसार, 'इंड सुपर ४०० डेज' या विशेष रिटेल फिक्स्ड डिपॉझिट प्रॉडक्टमध्ये १०,००० रुपयांपासून ३ कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर जास्त व्याज मिळते.

टेलिकॉम नियमांतही बदल

ट्रायची नवी मेसेज डिटेक्शन क्षमता वाढवण्यासाठी टेलिकॉम कंपन्या १ नोव्हेंबरपासून नवे नियम लागू करणार आहेत. हे नवीन उपाय व्यवहार आणि प्रमोशनल दोन्ही संदेशांच्या उत्पत्तीवर लक्ष ठेवेल. ट्रेसबिलिटी मानकांची पूर्तता न करणाऱ्यांसाठी हा बदल करण्यात आला आहे.

Whats_app_banner