Flipkart News: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून दररोज मोठ्या प्रमाणात ऑर्डर केल्या जातात. फ्लिपकार्टवरून वस्तू खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. फ्लिपकार्टमुळे घरबसल्या वस्तूंची खरेदी करता येऊ शकते. तसेच गरज नसल्यास कोणतीही ऑर्डर रद्दही करता येते. मात्र, यापुढे ऑर्डर रद्द करण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहे. कारण, फ्लिपकार्ट आता ऑर्डर रद्द करणाऱ्यांसाठी कॅन्सलेशन फी लागू करणार आहे.
ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म आता ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकांकडून कॅन्सलेशन फी आकारण्याचा विचार करत आहे. त्याची सुरुवात फ्लिपकार्टपासून होणार असल्याचे एका नव्या अहवालातून समोर आले आहे. टिप्सटर अभिषेक यादवने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये दावा केला आहे की, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा लवकरच ऑनलाइन ऑर्डर कॅन्सलेशन फी लागू करणार आहे.
हा कॅन्सलेशन फी का आकारली जाणार आहे, हे स्पष्ट करणारा स्क्रीनशॉटही टिप्सटरने शेअर केला आहे. विक्रेते आणि लॉजिस्टिक्स भागीदारांचा वेळ आणि त्यांची मेहनत लक्षात घेता ऑर्डर रद्द झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देणार आहे, असे फ्लिपकार्टसह इतर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मने ठरवले आहे. नव्या धोरणामुळे कंपनी ग्राहकांकडून आता २० रुपये जादा शुल्क आकारणार आहे, असा दावा केला जात आहे.
फ्लिपकार्टने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अशावेळी समोर आलेल्या स्क्रीनशॉटवरून केवळ अंदाज बांधता येऊ शकतात. वेगवेगळ्या ऑर्डरसाठी कॅन्सलेशन फी वेगवेगळी असू शकते, असेही बोलले जात आहे. प्रीमियम वस्तूंसाठी ग्राहकांकडून अधिक कॅन्सलेशन फी घेतली जाऊ शकते.
विशेष म्हणजे ग्राहकांनी मर्यादीत वेळेत ऑर्डर रद्द केल्यास त्यांना कोणतेही कॅन्सलेशन फी भरावी लागणार नाही. परंतु, ऑर्डर प्रोसेसमध्ये असेल, तसेच ट्रान्झिट किंवा शिपिंग स्टेजमध्ये असेल तर, ग्राहकांना कॅन्सलेशन फी देणे बंधनकारक असेल. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच यासंबंधीचे अपडेट्स शेअर करू शकते आणि फ्लिपकार्टनंतर मिंत्रा आपल्या ग्राहकांसाठी असे बदल करू शकते.
सध्या फ्लिपकार्टवर इंड ऑफ सीजन सेल सुरू आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोन, टीव्हीसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे काही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांनी संबंधित वस्तूची मूळ किंमत आणि फ्लिपकार्ट ऑफरशी तुलना करून पाहावे, कदाचित त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होऊ शकते.
संबंधित बातम्या