railway stocks news : मागील काही आठवड्यांपासून रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये आलेल्या जबरदस्त तेजीला आजच्या नफावसुलीमुळं ब्रेक लागला. आयआरएफसी, रेल विकास निगम, इरकॉन इंटरनॅशनल, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे शेअर आज ७ ते १४ टक्क्यांपर्यंत घसरले.
मागील आठवड्यात या पाचही शेअर्समध्ये तब्बल ५८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. विश्लेषकांच्या मते, आगामी २०२४ च्या अर्थसंकल्पात भारत सरकार रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नवीन गुंतवणुकीची घोषणा करेल या अपेक्षेमुळं रेल्वेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मजबूत तिमाही निकालांच्या अपेक्षेमुळं यात भर पडली होती.
रेल्वेच्या प्रमुख कंपन्यांपैकी इरकॉन इंटरनॅशनलच्या (Ircon International) शेअरला सर्वाधिक फटका बसला. हा शेअर १३.७० टक्क्यांनी घसरून २३० रुपयांवर आला. मागील आठवड्यात हा शेअर ३७ टक्क्यांनी वाढला होता. आजच्या घसरणीनंतरही जानेवारी महिन्यात आतापर्यंत या शेअरनं ३८.६२ टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदविली आहे. जुलै २०२२ मधील ३५.८० रुपयांच्या नीचांकी पातळीवरून २३० रुपयांच्या सध्याच्या मूल्यापर्यंत या शेअरनं आश्चर्यकारक वाढ दाखवत ५४२ टक्के इतका दणदणीत परतावा दिला आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (RailTel) शेअर आज १२.६० टक्क्यांनी घसरून ३८८ रुपयांवर पोहोचला. ही घसरण जमेस धरली तरी चालू महिन्यात या शेअरनं आतापर्यंत १८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
रेल विकास निगम (RVNL) हा आणखी एक मल्टीबॅगर शेअर आजच्या ट्रेडिंगमध्ये १० टक्क्यांनी घसरून २८८.५० रुपयांवर स्थिरावला. गेल्या आठवड्यात हा शेअर २०४.२५ रुपयांवरून ३२० रुपयांवर पोहोचला आणि त्यानं ५७.६१ टक्के परतावा दिला होता. यामुळं कंपनीचं बाजार भांडवल ६६,७९३ कोटी रुपयांवर पोहोचलं. जानेवारीत या शेअरमध्ये ५९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
आयआरएफसीचा (IRFC) शेअर आज इंट्राडे व्यवहारात ७.५३ टक्क्यांनी घसरून १६२.७५ रुपयांवर पोहोचला. गेल्याच आठवड्यात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ८२,०८२ कोटी रुपयांची वाढ झाली असून शेअर्स ५५.४२ टक्क्यांनी वधारले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीनं एक लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर पुढील एक लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यासाठी या कंपनीनं केवळ चार महिन्यांचा कालावधी घेतला. आजच्या घडीला कंपनीचं बाजार भांडवल २.१० लाख कोटी रुपये आहे. चालू महिन्यात आतापर्यंत त्यात ६२ टक्के वाढ झाली आहे.
आयआरसीटीसीच्या (IRCTC) शेअरमध्येही आज ९.२० टक्क्यांची घसरण झाली आणि तो ९३२.५० रुपयांवर पोहोचला.
(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)