Firstcry IPO Listing News : फर्स्टक्राय ब्रँड चालवणाऱ्या मल्टी चॅनेल रिटेल प्लॅटफॉर्म ब्रेनबिझ सोल्युशन्स लिमिटेडनं मंगळवारी शेअर मार्केटमध्ये दमदार पदार्पण केलं. एनएसईवर फर्स्टक्रायचा शेअर ६५१ रुपयांवर सूचीबद्ध झाला. ही किंमत मूळ इश्यू प्राइसपेक्षा ४० टक्क्यांनी जास्त आहे. तर, बीएसईवर फर्स्टक्रायचा शेअर ३४.४१ टक्क्यांच्या प्रीमियमसह ६२५ रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाला. बीएसईवर या शेअरने ७०७.०५ रुपयांचा उच्चांक गाठला. त्यामुळं गुंतवणूकदारांना तब्बल ५२ टक्के नफा झाला.
ब्रेनबिझ सोल्यूशन्स लिमिटेडचा आयपीओ ६ ऑगस्ट रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. तर, तीन दिवसांनी ८ ऑगस्ट रोजी बंद झाला. हा आयपीओ ५ ऑगस्ट रोजी मोठ्या गुंतवणूकदारांच्या सब्सक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फर्स्टक्रायची मूळ कंपनी ब्रेनबिझ सोल्यूशन्सचा आयपीओ बोलीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी १२.२२ पट सब्सक्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, ४,१९४ कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या समभाग विक्रीत ६०,६४,२९,४७२ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती, तर ४,९६,३९,००४ शेअर्ससाठी ऑफर देण्यात आली होती. पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणीत हा आयपीओ १९.३० पट, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत ४.६८ पट सब्सक्राइब झाला. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांचा (RII) हिस्सा २.३१ पट वाढला. ब्रेनबिझ सोल्यूशन्सनं अँकर गुंतवणूकदारांकडून १,८८६ कोटी रुपये गोळा केले आहेत.
आयपीओसाठी प्राइस बँड ४४० ते ४६५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. पुण्यातील ब्रेनबिझ सोल्यूशन्सच्या आयपीओमध्ये १,६६६ कोटी रुपयांच्या नव्या इक्विटी शेअर्सचा तर, विद्यमान भागधारकांच्या २,५२८ कोटी रुपयांच्या ५.४४ कोटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश होता. त्यामुळं या आयपीओची एकूण इश्यू साइज ४,१९४ कोटी रुपये होती.