Bajaj Upcoming Bike: बजाज ऑटो जगातील पहिली सीएनजी मोटारसायकल विकसित करीत आहे. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी याबाबत माहिती दिली. तसेच येत्या जून महिन्यात ही मोटारसायकल लॉन्च होईल, असेही त्यांनी सांगितले. राजीव बजाज यांनी पुढील पाच वर्षांत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी बजाज समूहाच्या ५ हजार कोटी रुपयांच्या वचनबद्धतेबद्दल बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे बजाजची ही सीएनजी मोटारसायकल बाजारात दाखल होताच धुमाकूल घालेल, अशी अपेक्षा आहे.
सीएनजी मोटारसायकल हा बजाज ऑटोचा अलीकडच्या वर्षांतील सर्वात महत्वाचा प्रकल्प आहे. कंपनी सीएनजीवर चालणाऱ्या तीनचाकी वाहनांची निर्मिती करते. आता कंपनीने सीएनजीवर चालणारी मोटारसायकल लॉन्च करण्याची योजना आखली. बजाज यांनी यापूर्वी आगामी सीएनजी मोटारसायकलच्या फीचर्सबाबत थोडक्यात माहिती दिली होती. या मोटारसायकलला बजाज ब्रुझर असे म्हटले जाऊ शकते.
नुकत्याच झालेल्या स्पाय शॉट्समध्ये या मोटारसायकलमधील काही फीचर्स समजले. मध्ये ११०- १२५ सीसी इंजिन मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने मायलेज पाहून दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करून सीएनजी मोटारसायकलबाबत योजना आखल्याचे अंदाज आहे. या मोटारसायकलमध्ये सीएनजीसह पेट्रोलचाही पर्याय मिळेल. सीएनजी व्हेरिएंटची किंमत पेट्रोल व्हेरिएंट मोटारसायकलपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
नवीन सीएनजी मोटारसायकलव्यतिरिक्त राजीव बजाज यांनी पल्सर ब्रँडलवकरच २० लाख विक्रीचा टप्पा गाठणार असल्याची माहिती दिली. पल्सर २००१ मध्ये लाँच करण्यात आली होती आणि कंपनीसाठी गेम-चेंजर ठरली होती. कंपनी या वर्षी आतापर्यंतची सर्वात मोठी पल्सर बाईक आणण्याची शक्यता आहे, ज्यात ४०० सीसी इंजिन मिळण्याची शक्यता आहे.