मराठी बातम्या  /  business  /  ITR : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणं आता अधिक सोपं! AIS करणार मदत
ASI
ASI

ITR : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणं आता अधिक सोपं! AIS करणार मदत

17 March 2023, 10:36 ISTGanesh Pandurang Kadam

AIS for Income Tax information : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची वेळ जवळ आल्यानं चिंतेत असलेल्या करदात्यांना इन्कम टॅक्स विभागानं मोठा दिलासा दिला आहे.

AIS for Income Tax information : आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले असल्यानं आता करदात्यांची जमवाजमव आणि जुळवाजुळव सुरू झाली आहे. अशा भांबावलेल्या करदात्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्राप्तिकर विभागानं करदात्यांच्या सोयीसाठी नवीन मोबाइल अ‍ॅप आणलं आहे. यात करदात्यांनी वर्षभरात केलेल्या प्रत्येक व्यवहाराची माहिती उपलब्ध होणार आहे. त्याच्या मदतीनं इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणं अधिक सोपं होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एआयएस (AIS) असं या अ‍ॅपचं नाव आहे. वार्षिक उत्पन्न, गुंतवणूक, एकूण खर्च, टीडीएस, कर भरणा किंवा थकबाकी आणि परतावा यासह ४६ प्रकारच्या व्यवहारांची माहिती या अ‍ॅपवर मिळणार आहे. करदात्यांच्या सोयीसाठी इन्कम टॅक्स विभागानं गेल्या वर्षीपासून वार्षिक माहिती अहवाल (AIS) देणं सुरू केलं आहे. यात करदात्याच्या ४६ प्रकारच्या व्यवहारांचा समावेश असतो. यातून करदात्याला व्यवहाराशी संबंधित अतिरिक्त माहिती मिळते. मागील आर्थिक वर्षात व्याज किंवा लाभांशातून किती उत्पन्न मिळालं? याशिवाय म्युच्युअल फंड, परदेशात पाठवलेला पैसा याचीही माहिती यात असते.

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना AIS चा वापर फायदेशीर ठरतो. करदात्याला किती कर भरायचा आहे याचा अंदाज येतो आणि रिर्टन भरताना संभाव्य चुका टाळता येतात.

असं डाउनलोड करा अ‍ॅप

गुगल प्ले स्टोअरवर जा आणि सर्च ऑप्शनमध्ये AIS for Taxpayers टाइप करा.

अॅप इन्स्टॉल करा आणि उघडा. लॉग इन करण्यासाठी तुमचा पॅन क्रमांक आणि जन्मतारीख टाका.

पॅन नंबरशी लिंक केलेला मोबाइल नंबर आणि ईमेल टाका.

तुमच्या मोबाईल आणि ईमेलवर OTP येईल. ते तिथं टाका.

त्यानंतर मोबाईल सिक्युरिटी पिन तयार करा. त्याशिवाय अॅप ओपन होणार नाही.

पिन टाकून अॅपवर लॉग इन करा. तुमचे तपशील उघडतील.

पुढे AIS लिंकवर क्लिक करा. मागील तीन आर्थिक वर्षांचे तपशील इथं पाहता येतील.

यंदाच्या आर्थिक वर्षाच्या तपशीलावर क्लिक करा.

वेबसाइटवरूनही अहवाल घेता येईल

इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर (www.incometax.gov.in) लॉग इन करून ASI माहिती मिळवता येते.

ASI म्हणजे काय?

वार्षिक माहिती स्टेटमेंट (ASI) मध्ये आर्थिक वर्षात केलेल्या व्यवहारांचा संपूर्ण तपशील असतो. रिटर्न भरण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. यात प्रत्येक व्यवहाराबद्दल अतिरिक्त माहिती असते.

ही माहिती मिळते!

वार्षिक उत्पन्न, मिळालेले भाडे, बँक शिल्लक, रोख जमा, रोख पैसे काढणे, क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहार, लाभांश, बचत खात्यावर मिळालेले व्याज, शेअर्स आणि म्युच्युअल फंडांची खरेदी, परदेश प्रवास, मालमत्तेची खरेदी इत्यादी.

६८ हजार प्रकरणांमध्ये अनेक विसंगती

२०१९-२० या वर्षात इन्कम टॅक्सच्या सुमारे ६८ हजार प्रकरणांमध्ये विसंगती आढळून आली होती. वार्षिक माहिती अहवाल (AIS) च्या मदतीनं इन्कम टॅक्स विभागानं या विसंगती शोधल्या आहेत. अशा करदात्यांना ई-मोहिमेद्वारे ईमेल, एसएमएस किंवा टॅक्स पोर्टलद्वारे माहिती दिली आणि लोकांनी ई-व्हेरिफिकेशनद्वारे माहिती अपडेट केली. मात्र, अद्यापही सुमारे ३३ हजार करदात्यांनी उत्तर दिलेलं नाही. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

विभाग