Fevicol Company Stock News : फेविकोल बनविणाऱ्या पिडिलाइट इंडस्ट्रीजचे तिमाही निकाल नुकतेच जाहीर झाले. या सकारात्मक निकालानंतर कंपनीचे शेअर तेजीत आहेत. आज पिडिलाइटचा शेअर ९ टक्क्यांनी वधारून २९९६ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा वाढला आहे. पिडिलाइटच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ९ टक्के वाढ झाली असून तो ५५७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कामकाजातून मिळणारा महसूल ७.६ टक्क्यांनी वाढून ३,३६८.९१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
पिडिलाईट इंडस्ट्रीजच्या शेअरची वाटचाल अपवाद वगळता सकारात्मक राहिली आहे. मागच्या पाच दिवसांत हा शेअर ७ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत या शेअरमध्ये ४ टक्के वाढ झाली आहे. एका वर्षात त्यात १७ टक्के तर पाच वर्षांत ११० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा जास्तीत जास्त परतावा ४८००० टक्क्यांपर्यंत आहे. १ जानेवारी १९९९ रोजी पिडिलाइटच्या शेअरचा भाव ६ रुपये होता, तो आज २९०० च्या वर गेला आहे. म्हणजेच, १९९९ साली जर कोणी या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्या गुंतवणुकीचं मूल्य वाढून सुमारे ५ कोटी रुपये झालं असतं.
कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ३४१४.४० रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत २५०३.४० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १,५१,४४ कोटी रुपये आहे.
कंपनीच्या सी अँड बी सेगमेंटचा महसूल वार्षिक आधारावर ५ टक्क्यांनी वाढून २,६७० कोटी रुपये झाला आहे. सेगमेंट ईबीआयटी २ टक्क्यांनी वाढून ७९० कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर ईबीआयटी मार्जिन ९० बेसिस पॉईंटनं घसरून २९.४ टक्क्यांवर आलं आहे.
बीटूबी सेगमेंटनं चमकदार कामगिरी केली असून महसुलात वार्षिक १९ टक्क्यांनी वाढ नोंदवत ७६० कोटी रुपये कमावले आहेत. सेगमेंटल ईबीआयटी ७६ टक्क्यांनी वाढून १३० कोटी रुपयांवर पोहोचला असून मार्जिन ५८० बेसिस पॉईंट्सनं वाढून १७.६ टक्के झालं आहे. ऑपरेशनल लेव्हलवर, एबिटडा वार्षिक आधारावर ८ टक्क्यांनी वाढून ८०० कोटी रुपयांवर पोहोचला, तर एबिटडा (EBITDA) मार्जिन आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत २३.७ टक्क्यांवर स्थिर राहिला.
संबंधित बातम्या