Nava Ltd Q2 Results : ऊर्जा क्षेत्राशी संबंधित नवा लिमिटेड या कंपनीने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आता कंपनीने शेअर स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनीच्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालाबरोबरच ही घोषणा करण्यात आली.
स्टॉक स्प्लिट अंतर्गत कंपनी एका शेअरची २ भागांमध्ये विभागणी करणार आहे. यासाठी लवकरच रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात येणार असून योग्य वेळी त्याची माहिती देण्यात येणार आहे. पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे कंपनीच्या सदस्यांच्या मान्यतेच्या अधीन राहून स्टॉक विभाजन केले जाईल, असे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे.
नवा लिमिटेडच्या ट्रेडिंग इतिहासात पहिल्यांदाच स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनीने यापूर्वी लाभांश आणि बोनस शेअर्स जारी केले असले तरी कधीही शेअर स्प्लिट केले नव्हते. शेअरधारकांना शेअर अधिक परवडण्याजोगा बनवून ट्रेडिंग लिक्विडिटी वाढवण्याच्या हेतूनं अनेकदा शेअर स्प्लिट केला जातो.
सप्टेंबर तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार प्रवर्तकांचा कंपनीत ४८.८५ टक्के हिस्सा होता. तर, ५१.१५ टक्के हिस्सा सर्वसामान्य गुंतवणूकदरांकडं आहे. प्रवर्तक एनएव्ही डेव्हलपर्स लिमिटेडचा कंपनीत ११.०९ टक्के हिस्सा आहे. त्याचप्रमाणे ए. एन. इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडे ६.५३ टक्के हिस्सा आहे.
नवा लिमिटेडने सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत ३३१.९७ कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १९३.२२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. मात्र, या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न घटून ९००.४८ कोटी रुपयांवर आले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत तो ९२१.९८ कोटी रुपये होता.
नवा लिमिटेडच्या शेअरने या वर्षी आतापर्यंत १०० टक्क्यांहून अधिक वाढ करून गुंतवणूकदारांची संपत्ती दुप्पट केली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये शेअरची किंमत ३७४.५५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर होती. १८ सप्टेंबर २०२४ रोजी शेअरचा भाव १३४६.७० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.