bank fd news : स्पेशल एफडीवर 'या' बँका देतायत तब्बल ८ टक्क्यांपर्यंत व्याज; कधीपर्यंत करता येईल गुंतवणूक? वाचा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  bank fd news : स्पेशल एफडीवर 'या' बँका देतायत तब्बल ८ टक्क्यांपर्यंत व्याज; कधीपर्यंत करता येईल गुंतवणूक? वाचा!

bank fd news : स्पेशल एफडीवर 'या' बँका देतायत तब्बल ८ टक्क्यांपर्यंत व्याज; कधीपर्यंत करता येईल गुंतवणूक? वाचा!

Jun 06, 2024 07:35 PM IST

Special Bank FD rates news : एफडीमध्ये गुंतवणुकीवर विश्वास असलेल्या गुंतवणूकदारांसाठी खूषखबर आहे. काही बँकांनी भरघोस व्याज देणाऱ्या विशेष एफडी योजना आणल्या आहेत.

स्पेशल एफडीवर 'या' बँका देतायत तब्बल ८ टक्क्यांपर्यंत व्याज; कधीपर्यंत करता येईल गुंतवणूक? वाचा!
स्पेशल एफडीवर 'या' बँका देतायत तब्बल ८ टक्क्यांपर्यंत व्याज; कधीपर्यंत करता येईल गुंतवणूक? वाचा!

Bank FD news : अडीअडचणींच्या काळात लागणारे पैसे ठेवण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानला जातो. बिगर बँकिंग कंपन्याही (NBFC) ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देतात. मात्र बऱ्याच ग्राहकांचा विश्वास सरकारी किंवा खासगी बँकांवर अधिक असतो. त्यामुळं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँका जास्तीत जास्त व्याजाच्या विशेष मुदत ठेव योजना आणतात. अशाच काही भरघोस व्याज देणाऱ्या एफडी योजना काही बँकांनी ग्राहकांसाठी आणल्या आहेत. जाणून घेऊया या योजना आणि त्यांच्या डेडलाइनबद्दल.

IDBI बँक विशेष उत्सव एफडी

IDBI बँक आपल्या उत्सव मुदत ठेव योजनेत विशेष व्याजदर देत आहे. यात सर्वसाधारण ग्राहकांना ३०० दिवसांच्या FD वर ७.०५ टक्के व्याज मिळेल. तर, ज्येष्ठ ग्राहकांसाठी बँक ३०० दिवसांच्या एफडीवर ७.५५ टक्के व्याज देत आहे. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर ३७५ दिवसांची FD निवडू शकता. यावर तुम्हाला ७.०१ टक्के व्याज मिळेल. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर हा व्याजदर ३७५ दिवसांसाठी ७.६ टक्के असेल. यापेक्षा जास्त कालावधीसाठी, बँक ४४४ दिवसांची विशेष एफडी ऑफर करत आहे. या योजनेत सामान्य ग्राहकांना ७.२ टक्के व्याज मिळू शकते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर ७.७ टक्के असेल. ही विशेष एफडी योजना ३० जून २०२४ पर्यंत उपलब्ध आहे.

इंडियन बँक विशेष एफडी

इंडियन बँक ग्राहकांना ३०० दिवसांच्या कालावधीसाठी इंड सुप्रीम एफडी आणि ४०० दिवसांच्या कालावधीसाठी इंड सुपर एफडी ऑफर करत आहे. ही बँक सर्वसाधारण ग्राहकांना ३०० दिवसांच्या एफडीवर ७.०५ टक्के परतावा देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर ७.५५ टक्के असेल. याशिवाय सुपर सिटीझन या एफडीमध्ये गुंतवणूक करून ७.८० टक्के व्याज मिळवू शकतात. जर तुमची स्पेशल एफडी ४०० दिवसांची असेल तर बँक तुम्हाला ७.२५ टक्के व्याज देईल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याज दर ७.७५ टक्के असेल. तर सुपर ज्येष्ठ नागरिकांना इंडियन बँकेच्या या एफडीवर ८ टक्के व्याज मिळेल. ही योजना ३० जून २०२४ पर्यंत उपलब्ध आहे.

पंजाब आणि सिंध बँक विशेष एफडी

पंजाब आणि सिंध बँकेनं देखील वेगवेगळ्या कालावधीच्या विशेष एफडी योजना आणल्या आहेत. या बँकेत ग्राहक २२२, ३३३ आणि ४४४ दिवसांसाठी FD करून प्रचंड व्याज मिळवू शकतात. ही बँक २२२ दिवसांच्या एफडीवर ७.०५ टक्के व्याज देतेय, तर ३३३ दिवसांच्या एफडीवर ७.१० टक्के व्याज देत आहे. तुम्ही ४४४ दिवसांसाठी एफडी केल्यास हाच व्याज दर ७.२५ टक्क्यांपर्यंत वाढेल. पंजाब आणि सिंध बँकेच्या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख देखील ३० जून २०२४ आहे.

एसबीआय अमृत कलश योजना

SBI ग्राहक अमृत कलश योजनेची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, १२ एप्रिल २०२३ पासून अमृत कलश योजनेत ४०० दिवस गुंतवणूक केल्यास ७.१० टक्के परतावा मिळेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांच्यासाठी ७.६० टक्के व्याजदर असेल. ही ऑफर ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वैध असेल. याशिवाय, SBI च्या WeCare योजनेत गुंतवणूक करून ७.५० टक्के व्याज मिळवता येते.

Whats_app_banner