Business Ideas : बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला कुटुंबाकडून साथ मिळणे किती गरजेचे असते?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला कुटुंबाकडून साथ मिळणे किती गरजेचे असते?

Business Ideas : बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला कुटुंबाकडून साथ मिळणे किती गरजेचे असते?

HT Marathi Desk HT Marathi
Oct 25, 2024 02:25 PM IST

Business Ideas : व्यवसायासाठी व्यक्तीला त्याच्या कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असणे अत्यंत आवश्यक असते. आई-वडील-पत्नी-मुले किंवा नातलग-मित्र यांचा आपल्या कार्याला विरोध असेल तर त्यामागची कारणे शांतपणे जाणून घ्यावीत.

व्यापार-उद्योगामध्ये आवश्यक असते कुटुंबाची साथ
व्यापार-उद्योगामध्ये आवश्यक असते कुटुंबाची साथ

 

धनंजय दातार

माझ्या वडिलांनी आयुष्यभर नोकरी केली आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर प्रथमच व्यवसायात उतरण्याचे धाडस केले. त्यात त्यांना मार्गदर्शन करणारे कुणी नव्हते. बाबा निश्चयी व कष्टाळू होते आणि जोखीम घेण्याची त्यांची तयारी होती, सर्वांत अनुकूल घटक म्हणजे त्यांना माझ्या आईचा भक्कम पाठिंबा होता. ‘आपल्या घराण्यात कुणी धंदा केलेला नाही, व्यापार करणे आपले काम नाही, किंवा धंद्यात अयशस्वी झाल्यास मुलाबाळांचे कसे होईल,’ अशा शंका न काढता आई बाबांच्या पाठीमागे निर्धाराने उभी राहिली. 

बाबांना नेहमी पैशाची गरज भासे व कुठूनही सोय न झाल्यास अखेर ते आईच्या गळ्यातील सोन्याची साखळी बिनधास्त गहाण ठेवत. मला हे विचित्र वाटल्याने एकदा मी तसे आईला बोलून दाखवल्यावर ती हसून म्हणाली, “दादा, ती साखळी आम्ही त्याच कारणासाठी बनवली आहे. ती माझ्या गळ्यात दिसते तेव्हा तुझे बाबा आश्वस्त असतात आणि साखळी गहाण पडल्यावर ती सोडवण्यासाठी अधिक जिद्दीने काम करतात. बघ एकच गोष्ट दिलासाही देते आणि प्रेरणाही.” पण खरं सांगायचं तर बाबांना दिलासा आणि प्रेरणा देणारी साखळी नसून माझी आई होती. समजूतदार पत्नी मिळण्याबाबत मीसुद्धा नशिबवान ठरलो. व्यावसायिकाची व्यग्र जीवनशैली व अनिश्चित उत्पन्न या आव्हानांची कल्पना मी तिला विवाहापूर्वीच दिली होती. त्यावर तिने छान उत्तर दिले होते. ती म्हणाली, “मी शेतकरी कुटुंबातील आहे आणि शेतीत दरवर्षी अनिश्चितता असल्याने कशाही स्थितीला तोंड द्यायला आम्ही आपोआप शिकतो. मी तुम्हाला कधीही व्यवसायापासून अलग करणार नाही.” मला तिचा तो आत्मविश्वास खूप भावला. खरोखरच माझ्या पत्नीने मला व्यवसायात धाडस करण्यापासून कधीही रोखले नाही. उलट मला व्यापारात जबाबदाऱ्या पेलण्यास अधिकाधिक वेळ मिळावा म्हणून तिने घराच्या व्यवस्थापनाकडे आणि मुलांच्या शिक्षण-संगोपनाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले. 

पुढे मला आमच्या कंपनीत घरचे कुणीतरी विश्वासाचे माणूस सोबत असण्याची गरज भासल्याने मी तिला विचारले. ती त्याबाबतही मागे राहिली नाही. तिने कंपनीचे वित्त व्यवस्थापन हातात घेऊन अनावश्यक खर्च वाचवले, हिशेबाची शिस्तशीर घडी बसवली आणि मंदीच्या काळातही कंपनीच्या नफाक्षमतेत ४०० टक्क्यांनी प्रगती करुन दाखवली. माझी मुले घरात व्यवसायाचे वातावरण बघत मोठी झाली. पदवी घेतल्यानंतर त्यांनीही स्वेच्छेने घरच्या व्यवसायात हातभार लावण्यास सुरवात केली. मी यशस्वी होण्यात माझ्या कुटुंबियांचा पाठिंबा फार मोलाचा आहे.

याउलट मी असेही उदाहरण बघितले आहे, जेथे कुटुंबाचा पाठिंबा नसताना हट्टाने उद्योग सुरु केला आणि नंतर मनस्ताप वाट्याला आला. मुंबईत माझा एक मित्र बहुराष्ट्रीय कंपनीत भरपूर पगारावर नोकरी करत होता. एका क्षेत्रात संधी दिसल्याने त्याने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु केला. वास्तविक त्याच्या पत्नी व मुलांचा याला विरोध होता. नवा व्यवसाय स्थिरावण्यासाठी सुरवातीची तीन वर्षे द्यावी लागतात. प्रसंगी नुकसान सोसून व्यवसायाला भांडवलाची संजीवनी द्यावी लागते. पण याच टप्प्यात माझ्या मित्राच्या कुटुंबाची जीवनशैली बदलली. इतके दिवस भरभक्कम पगार नियमित येत असल्याने घरखर्च भागून काही भाग चैनीसाठी खर्च करता येत होता. आता व्यवसायामुळे आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली. अधिकाधिक पैसा धंद्यातील पुनर्गुंतवणूक म्हणून वापरावा लागला. ती स्थिती कौशल्याने हाताळण्यात घरचे कमी पडले. त्यांना कम्फर्ट झोन सोडणे किंवा तडजोड करणे शक्य झाले नाही. पती- पत्नी-मुलांत खर्चाच्या कारणावरुन वाद होऊ लागले. कटकटींमुळे वैतागून पत्नी मुलांना घेऊन माहेरी जाऊन राहिली. अखेर या मानसिक दडपणापुढे हार मानून माझ्या मित्राने व्यवसाय गुंडाळला आणि तो पुन्हा दुसऱ्या कंपनीत नोकरीवर हजर झाला. त्याला पाच वर्षांचा काळ मनस्तापात गेला. वाईट म्हणजे एक होतकरु उद्योजक घडता घडता राहिला आणि पुन्हा नोकरदार झाला. 

मित्रांनो! व्यवसायाचे पहिले उद्दिष्ट्य कुटुंबाचे कल्याण आणि मनाचे समाधान असते. पण ते साध्य होण्यासाठी कुटुंबातूनच प्रेरणा मिळणार नसेल तर काय उपयोग? एक बोधप्रद सुभाषित आहे, ज्याच्या अर्थामध्ये कुटुंबाचा पाठिंबाही समाविष्ट करावा, असे मला वाटते. 

कः कालः कानि मित्राणी को देशः को व्ययाऽऽ गमौ।

कस्याहं का च मे शक्तिरिती चिन्त्यं पुनः पुनः॥

(वेळ कुठली, मित्र कोण, प्रदेश कोणता, खर्च किती, जमा किती, मी कोण, माझी शक्ती किती हा विचार पुन्हा पुन्हा करावा.)

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

Whats_app_banner