Extension of ITR deadline : कोणत्याही भूर्दंडाशिवाय इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत आज ३१ जुलै २०२३ आहे. आयटीआर फाइलिंग, कर भरणा आणि इतर संबंधित सेवांमध्ये मदत करण्यासाठी आज दिवसभर उघडलेल्या कर विभागाच्या हेल्पडेस्कशी करदाते संपर्क साधू शकतात. फोन, लाइव्ह चॅट, वेबेक्स मीटिंग आणि सोशल मीडियावर मदत केली जात आहे.
१९६१ च्या आयकर कायद्याच्या कलम २३४ एफनुसार, जो कोणी आपला आयटीआर उशीरा दाखल करतो त्याला ५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागतो. लहान करदात्यांना त्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना १००० रुपये दंड भरावा लागेल.
अंतिम मुदत जवळ आल्याने अनेक करदात्यांना कर भरण्याची घाई आहे. परंतु अनेक करदात्यांना त्यांचे विवरणपत्र भरताना एक ना एक समस्या भेडसावत आहे. काही राज्यांमध्ये पुरामुळे, त्या व्यक्तींना त्यांचे रिटर्न वेळेवर भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे लाखो करदात्यांनी ट्विटरवर त्यांचे मुद्दे मांडले आणि आयकर खात्याकडे मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया -
आयकर पोर्टल डाऊन आहे. कधी अप होईल माहित नाही.
गेल्या दोन दिवसांपासून साईट डाऊन आहे. आम्ही कसा काय टॅक्स भरणार.
पेज नुसतचं लोडिंग दाखवत आहे. आयटीआर भरू शकत नाही, प्रत्येक वेळी लॉगिन समस्या येत आहे.
मला आयटीआर भरताना समस्या येत आहे. कृपया मदत करा.
'पुढे जा' बटण काम करत नाही. मी फाइल करण्याचा प्रयत्न करत आहे पण 'पुढे जा' बटण निष्क्रिय आहे. मी माझा फॉर्म माझ्या पुढील लॉगिनमध्ये सेव्ह केल्यास डेटा नष्ट होईल.