Explainer : एनएफओ म्हणजे काय? ते किती प्रकारचे असतात आणि त्यात गुंतवणूक कशी करतात?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Explainer : एनएफओ म्हणजे काय? ते किती प्रकारचे असतात आणि त्यात गुंतवणूक कशी करतात?

Explainer : एनएफओ म्हणजे काय? ते किती प्रकारचे असतात आणि त्यात गुंतवणूक कशी करतात?

Jan 13, 2025 04:52 PM IST

NFO Explainer : एनएफओ अर्थात न्यू फंड ऑफर म्हणजे नेमकं काय असतं? ही ऑफर कशासाठी आणली जाते आणि त्यात गुंतवणूक कशी करतात? जाणून घेऊया…

Explained : एनएफओ म्हणजे काय? ते किती प्रकारचे असतात आणि त्यात गुंतवणूक कशी करतात?
Explained : एनएफओ म्हणजे काय? ते किती प्रकारचे असतात आणि त्यात गुंतवणूक कशी करतात?

Understanding NFO : नवीन फंड ऑफर अर्थात एनएफओ (NFO) म्हणजे एखाद्या नव्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनीनं (AMC) आणलेली ऑफर असते. गुंतवणूकदारांना फंडातील युनिट्स खरेदी करण्यासाठी हे आमंत्रण असते.

न्यू फंडाच्या ऑफरचा कालावधी १० ते १५ वर्षांचा असतो. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर युनिट्स विकले जातात. युनिट्सची किंमत आधीच निश्चित झालेली असते. बऱ्याचदा ती किंमत १० रुपये असते. 

एनएफओचा कालावाधी संपल्यानंतर संबंधित फंड योजना शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होते आणि त्यानंतर निव्वळ मालमत्ता मूल्यानुसार (Net Asset Value) फंडाच्या युनिट्सची किंमत खाली-वर जाते. एनएफओमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना फंडाच्या वाढीचा फायदा मिळण्याची शक्यता असते. दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून असलेले गुंतवणूकदार एनएफओमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

म्युच्युअल फंड हाऊसेस स्टॉक किंवा डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी भांडवल जमा करण्यासाठी एनएफओचा वापर करतात. २०२४ मध्ये अनेक नवीन म्युच्युअल फंडांनी प्रभावी कामगिरी केली. काहींनी तब्बल २७ टक्क्यांपर्यंत परतावा दिला. विशेषत: सेक्टरल आणि थीमॅटिक फंडांनी मजबूत परतावा दाखवला. कॅनरा रोबेको मॅन्युफॅक्चरिंग फंड आणि मोतीलाल ओसवाल लार्ज कॅप फंड यांनी त्यांच्या स्थापनेपासून अनुक्रमे २६.९० टक्के आणि २६.७० टक्के परतावा दिला आहे.

NFOs कोण सुरू करतो?

नवीन म्युच्युअल फंड योजना सादर करण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (AMCs) द्वारे नवीन फंड ऑफर (NFOs) सुरू केल्या जातात. AMCs या फंडांची रचना आणि व्यवस्थापन करतात. गुंतवणूकदारांना सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणूक करण्याची संधी देतात.

एनएफओचे प्रकार

ओपन एंडेड एनएफओ, क्लोज एंडेड एनएफओ आणि इंटरव्हल एनएफओ हे एनएफओचे दोन प्रकार असतात. 

ओपन एंडेड फंड

ओपन-एंडेड एनएफओ प्रकारात प्रारंभिक ऑफर कालावधी संपल्यानंतरही म्युच्युअल फंड युनिट्समध्ये गुंतवणूक करता येते. आपल्या सोयीनुसार या योजनांमध्ये प्रवेश करता येतो आणि बाहेर पडता येतं. कोणत्याही कामकाजाच्या दिवशी चालू NAV वर ओपन-एंडेड फंड युनिट्स खरेदी करता येतात.

क्लोज-एंडेड फंड

या प्रकारच्या NFO मध्ये केवळ प्रारंभिक ऑफर कालावधीतच गुंतवणूक करता येते. या योजना निश्चित कालावधीसाठी जारी केल्या जातात. एकदा NFO कालावधी संपला की, फंडात पुढील गुंतवणुकीला परवानगी नाही. स्टॉक एक्स्चेंजमध्ये फंड सूचीबद्ध झाल्यानंतर डीमॅटमध्ये असलेल्या युनिट्स दुय्यम बाजारात विकल्या जाऊ शकतात. सेबीच्या नियमांनुसार, सर्व क्लोज-एंड फंड एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केलं जाणं आवश्यक आहे.

इंटरव्हल फंड

इंटरव्हल फंड हे ओपन-एंडेड फंड आणि क्लोज-एंडेड फंड या दोन्हीचं मिश्रण असतं. हे फंड क्लोज-एंडेड फंडांच्या श्रेणीत येतात, परंतु ते तुम्हाला नियमित अंतरानं AMC विंडोमधून खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी देतात. हे अंतर वार्षिक किंवा अर्धवार्षिक असू शकतं. यामुळं गुंतवणूकदारांना विशिष्ट कालमर्यादेत व्यवहार करता येतो.

NFOs मध्ये कोणी गुंतवणूक करावी?

दीर्घकालीन गुंतवणुकीचं उद्दिष्ट असलेल्या आणि नवीन योजनांशी संबंधित जोखीम घेण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी NFOs योग्य आहेत. गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदारांनी योजना-संबंधित सर्व कागदपत्रं काळजीपूर्वक वाचली पाहिजेत.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner