किरकोळ विक्री क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयटीसी लिमिटेडचं डीमर्जर होत आहे. मुख्य कंपनीतून हॉटेल व्यवसाय वेगळा काढला जात असून यापुढं आयटीसी हॉटेल्स ही एक स्वतंत्र कंपनी म्हणून कार्यरत राहणार आहे. या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट जगतातील 'डीमर्जर' ही प्रक्रिया सध्या चर्चेत आहे. काय असतो हा प्रकार? का होते कंपनी डीमर्ज? गुंतवणूकदारांसह इतरांवर त्यांचे काय परिणाम होतात? पाहूया…
डिमर्जर हा कॉर्पोरेट पुनर्रचनेचा एक प्रकार असतो. या माध्यमातून एखाद्या मोठ्या कंपनीच्या व्यवसायाचं विभाजन केलं जातं. डीमर्जरमुळं मोठ्या कंपनीला त्याच्या विविध ब्रँड्स किंवा व्यवसाय युनिट्सचं विभाजन करण्याची, व्यवसायाच्या मुख्य उत्पादन लाइनचा भाग नसलेले घटक विकून भांडवल उभारण्याची किंवा विविध ऑपरेशन्स हाताळण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर संस्था तयार करण्याची परवानगी मिळते.
> डिमर्जर म्हणजे एखादी कंपनीच्या वेगवेगळ्या व्यवसायांचं स्वतंत्र कंपन्यांमध्ये होणारं विभाजन. या विभाजनाचा हेतू स्वतंत्रपणे काम करण्याचा किंवा काही युनिट्स विकण्याचा असू शकतो.
> डीमर्जरची कारणं अनेक असतात. कंपनीच्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी… कमी महत्त्वाच्या युनिट्स वेगळ्या काढून विक्री करून भांडवल वाढवण्यासाठी किंवा टेकओव्हर टाळण्यासाठी.
> डीमर्जरमध्ये स्पिन-ऑफ हा प्रकार सर्वाधिक प्रचलित आहे. या प्रकारात कंपनी आपला एखादा व्यवसाय वेगळा काढून नवीन कंपनी सुरू करते आणि नव्या कंपनीवर इक्विटीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवते.
डीमर्जरमुळं कंपनीची पुनर्रचना होऊन यशाची शक्यता वाढते. अकाऊंटिगच्या दृष्टीनं काही अडचणी निर्माण होत असलेल्या तरी करांचे फायदे आणि इतर बाबतीत कार्यक्षमतेत वाढ होते. डिमर्जरमुळं पुढील गोष्टी साध्य होऊ शकतात…
> सर्वात फायदेशीर युनिट्सवर लक्ष केंद्रित करता येते.
> कामकाज अधिक सुरळीत होते.
> जोखीम कमी होते.
> शेअरहोल्डरच्या गुंतवणुकीचं मूल्य वाढतं
> विशिष्ट व्यवसाय युनिट्स किंवा ब्रँड मॅनेज करण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करता येते
> भांडवल उभारण्याची संधी मिळते.
> प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून टेकओव्हरला प्रतिबंध करता येतो.
> लहान व्यवसाय साधारणपणे सहज चालतात आणि त्यामुळं त्यांना डिमर्जरची गरज नसते. तथापि, जेव्हा कंपन्या वाढतात तेव्हा त्यांचा पसारा वाढतो आणि गुंतागुंत वाढते. अनेक विभाग निर्माण होतात. अशा परिस्थितीत डीमर्जर उपयुक्त ठरू शकते आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी कारणंही अनेक असतात.
> एखाद्या कंपनीची व्यावसायिक युनिट्स नीट चालत नसतील. कंपनीवर आर्थिक ताण वाढवत असतील तर ती बंद करण्यासाठी, विक्रीस काढण्यासाठी डीमर्जर केलं जाऊ शकतं.
> मोठ्या समूहातील कंपन्यांना सुव्यवस्थित करण्याची आवश्यकता असू शकते, विशेषत: या समूहांनी नव्या कंपन्यांचं संपादन केलं असेल तर त्यांचा एकूण उद्देश आणि व्यवसाय योजना बदलतात.
> बिझनेस युनिट्स डिव्हेस्ट करून भांडवल वाढवण्याची किंवा प्रतिष्ठित मालमत्ता काढून नकोसं असलेलं टेकओव्हर रोखण्यासाठी डीमर्जर ही एक सोयीस्कर पद्धत ठरू शकते. अद्याप मार्केटला कल्पना नसलेली, पण कंपनीच्या व्यवस्थापनाला माहीत असलेली एखादी अडचण चव्हाट्यावर येण्याआधी सोडवण्यासाठी (म्हणूनच कॉर्पोरेट इनसाइडर्स डीमर्जरमधून नफा मिळवतात.) डीमर्जर महत्त्वाचं ठरतं.
> एखाद्या कंपनीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सरकार पावलं उचलू लागल्यास त्यापासून वाचण्यासाठी डीमर्जरचा विचार केला जाऊ शकतो.
डीमर्जरचे अनेक प्रकार असले तरी खालील तीन सर्वाधिक प्रचलित आहेत.
या प्रकारात मूळ कंपनीला डीमर्ज होऊन निर्माण झालेल्या नव्या कंपनीत इक्विटी स्टेक मिळतो. नव्या कंपनीचे शेअर्स नंतर स्वतंत्रपणे खरेदी आणि विक्री केले जातात आणि गुंतवणूकदारांना युनिटचे शेअर्स खरेदी करण्याचा पर्याय दिला जातो. अंशत: डीमर्जरमध्ये मूळ कंपनी डिमर्ज्ड कंपनीमध्ये एकूण भागभांडवल राखून ठेवते.
स्प्लिट-ऑफ प्रकारच्या डीमर्जरमध्ये मूळ कंपनीचे अनेक व्यवसाय एकापेक्षा जास्त कंपन्यांत विभागले जातात. मूळ कंपनी लिस्टेड असल्यास भागधारकांना नव्या कंपनीत शेअर्स देऊन ट्रेडिंगची मुभा दिली जाते.
लिक्विडेशन डीमर्जरमध्ये संकटात असलेले युनिट बंद करून नव्या कंपनीची रचना केली जाते. बंद युनिट्सच्या मालमत्ता नवीन कंपन्यांमध्ये मालमत्ता विभागली जाते. व्यवस्थापन, संचालक मंडळाचे सदस्य आणि भागधारकांमध्ये व्यवसायाबद्दल मतभेद निर्माण झाल्यास हे पाऊल उचललं जातं.
डीमर्जरचे जसे फायदे असतात, तसे तोटेही असू शकतात. डीमर्जरचा सर्वात ठळकपणे दिसणारा फायदा म्हणजे शेअरहोल्डरच्या मूल्यात होणारी वाढ. कारण, गुंतवणुकदारांना नवीन कंपनीचे शेअर्स मिळतात आणि नवीन कंपनी फायदेशीर झाल्यास आर्थिक लाभ होतात.
नवीन डीमर्ज्ड कंपन्या त्यांच्या व्यवसायावर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात. याचा अर्थ ते गुंतवणुकीचे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात, भांडवल वाढवू शकतात, संशोधन आणि विकास (R&D) करू शकतात आणि मूळ कंपनीशी सल्लामसलत न करता स्वतः मार्केटिंगचे मार्ग निवडू शकतात.
डीमर्जरची प्रक्रिया बरीच खर्चिक असते. या प्रक्रियेमुळं कराशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात. डीमर्जरसाठी कॉर्पोरेट पुनर्रचनेसाठी आवश्यक काही प्रक्रियांचं पालन होणं आवश्यक आहे. ते न झाल्यास वेगळीच भानगड उभी राहू शकते.
डीमर्जरचा कंपनीच्या शेअरहोल्डर्सच्या आर्थिक स्थितीवर व हितसंबंधांवर थेट परिणाम होतो. त्यामुळं त्यास भागधारकांची मान्यता आवश्यक असते. ती मान्यता न मिळाल्यास कंपनीचा भविष्यातील विस्तार व योजनांमध्ये अडथळा येऊ शकतो.
संबंधित बातम्या