B2C : सगळेच उद्योग-व्यवसाय थेट ग्राहकांशी संबंधित नसतात. काही उद्योगांचा संबंध उद्योगांशी येतो. काही उद्योगांचा संबंध सरकारशी येतो. तर, काहींचा थेट ग्राहकांशी येतो. जेव्हा एखाद्या व्यवसायाचा संबंध थेट ग्राहकाशी येतो, तेव्हा त्या व्यवसायाला B2C अर्थात बिझनेस टू कन्झ्युमर असं म्हणतात.
बी२सी ही संकल्पना उद्योग आणि ग्राहक यांच्यातील थेट संबंध प्रस्थापित करते. यात एखादा उद्योग आपली उत्पादनं वा सेवा थेट ग्राहकांना पुरवतो. अशा कंपन्यांना B2C कंपन्या असं म्हणतात.
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात डॉटकॉम बूमच्या काळात B2C संकल्पना प्रचंड लोकप्रिय झाली. इंटरनेटद्वारे ग्राहकांना उत्पादनं आणि सेवा विकणाऱ्या ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांसाठी ही संकल्पना त्यावेळी वापरली जात असे.
बिझनेस मॉडेल म्हणून B2C हे मॉडेल B2B या संकल्पनेपेक्षा पूर्ण वेगळं आहे. B2B मॉडेलमध्ये दोन किंवा अधिक उद्योगांमधील व्यवहाराचा संबंध असतो. B2C मध्ये इतर कुणालाही मध्यस्थ न ठेवता थेट ग्राहकांना उत्पादनं व सेवा पुरवली जाते.
> इंटरनेटद्वारे आपली उत्पादनं व सेवा ग्राहकांना देणाऱ्या व्यवसायांना B2C असं म्हणतात.
> ऑनलाइन B2C व्यवसाय हा पारंपारिक किरकोळ विक्रेत्यांसाठी संकट बनून उभा राहिला आहे.
> बीटूसी मॉडेलवर काम करणाऱ्या Amazon, eBay आणि Priceline सारख्या कंपन्या भरभराटीला आल्या आहेत. त्यांनी उद्योगविश्वात उलथापालथ घडवली आहे.
मायकेल आल्ड्रिच यांनी १९७९ मध्ये प्रथम B2C ची संकल्पना वापरली आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्राथमिक माध्यम म्हणून टेलिव्हिजनचा वापर केला.
पारंपरिक दृष्टीकोनातून मॉल शॉपिंग, रेस्टॉरंट्समध्ये खाणं, सिनेमागृह अशा व्यावसायिकांसाठी B2C संकल्पना वापरतात. तथापि, इंटरनेटच्या उदयामुळं ई-कॉमर्स किंवा इंटरनेटवर वस्तू आणि सेवांची विक्री या स्वरूपात संपूर्ण नवीन B2C व्यवसाय चॅनेल तयार झालं.
डॉटकॉमचा फुगा फुटल्यानंतर अनेक B2C कंपन्या गायब झाल्या. या क्षेत्रातील गुंतवणूकदारांची आवड कमी झाली आणि व्हेंचर कॅपिटल फंडिंग आटलं. तरीही Amazon आणि Priceline सारख्या B2C मधील दिग्गज कंपन्या तग धरून राहिल्या आणि कालांतरानं त्यांनी मोठं यश मिळवलं.
B2C मॉडेलवर काम करणाऱ्या कंपनीला त्यांच्या ग्राहकांशी उत्तम संबंध ठेवावे लागतात. ग्राहक टिकविण्याची ती पहिली अट असते. कंपनीची उत्पादनं आणि सेवांचा वरचेवर आढावा घ्यावा लागतो आणि गरजेनुसार त्यात बदल करावे लागतात.
बिझनेस-टू-बिझनेस (B2B) मॉडेलवर काम करणाऱ्या कंपन्या उत्पादन किंवा सेवेच्या गुणवत्तेवर अवलंबून असतात. मात्र, ज्या कंपन्या B2C वर अवलंबून असतात त्या ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या मार्केटिंगला भावनेची जोड देतात.