Explainer : शेअर बाजारात प्रचलित असलेल्या अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट या संकल्पनांचा अर्थ काय?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Explainer : शेअर बाजारात प्रचलित असलेल्या अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट या संकल्पनांचा अर्थ काय?

Explainer : शेअर बाजारात प्रचलित असलेल्या अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट या संकल्पनांचा अर्थ काय?

Dec 30, 2024 04:59 PM IST

Upper Circuit And Lower Circuit : शेअर मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या संज्ञा आणि संकल्पना वापरल्या जातात. त्यापैकी सर्रास वापरली जाणाऱ्या संकल्पना म्हणजे अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट. काय आहेत या संकल्पना? जाणून घेऊया सविस्तर

Stock Market Explainer : शेअर बाजारात प्रचलित असलेल्या अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट या संकल्पनांचा अर्थ काय?
Stock Market Explainer : शेअर बाजारात प्रचलित असलेल्या अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट या संकल्पनांचा अर्थ काय?

Stock Market News : शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करणाऱ्यांना अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट हे शब्द रोजच्या रोज ऐकायला मिळतात. कोणत्या ना कोणत्या शेअरला अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किट लागत असतं. काय आहे या शब्दांचा अर्थ? कशासाठी होतो या संकल्पनांचा वापर? जाणून घेऊया सविस्तर…

अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट या संकल्पना शेअरच्या किंमतीवरील मर्यादेसाठी वापरल्या जातात. या दोन संकल्पना शेअर बाजारातील अति अस्थितरतेला आळा घालतात आणि त्यापासून गुंतवणूकदारांचं संरक्षण करतात. कसं ते पाहूया…

अप्पर सर्किट लागल्यावर काय होतं?

अप्पर सर्किट ही शेअरच्या वधारणाऱ्या किंमतीवर घातलेली मर्यादा असते. जेव्हा एखाद्या शेअरचा भाव ठराविक किंमतीच्या वर जात नाही आणि शेअरचे व्यवहार बंद होतात, तेव्हा त्या शेअरला अप्पर सर्किट लागलं असं म्हणतात. एकदा अप्पर सर्किट लागलं की गुंतवणूकदारांना तो शेअर खरेदी करता येत नाही.   

लोअर सर्किट लागल्यावर काय होतं?

लोअर सर्किट ही संकल्पना अप्पर सर्किटच्या नेमकी उलट आहे. लोअर सर्किट म्हणजे घसरणाऱ्या शेअरच्या किंमतीवर घातलेली मर्यादा असते. जेव्हा एखाद्या शेअरचा भाव ठराविक किंमतीच्या खाली जात नाही तेव्हा त्याला अप्पर सर्किट लागलं असं म्हणतात. एकदा लोअर सर्किट लागलं की गुंतवणूकदारांना तो शेअर विकता येत नाही. दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागते.

कशी ठरते सर्किटची मर्यादा?

स्टॉक एक्सचेंज मागील दिवसाच्या बंद किंमतीच्या आधारावर प्रत्येक स्टॉकसाठी अप्पर आणि लोअर सर्किट्स निश्चित करते. सर्वसामान्यपणे ५, १०, १५ आणि २० टक्क्यांवर अप्पर किंवा लोअर सर्किट लागतं. कंपनी कोणती आहे त्यावर देखील ही टक्केवारी ठरते.

गुंतवणूकदारांना ठरते मार्गदर्शक

अप्पर आणि लोअर सर्किट्स समजून घेणं हे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचं असतं. विशेषत: बाजार तेजीत असताना ते महत्त्वाचं ठरतं. उदाहरणार्थ, एखादा स्टॉक त्याच्या अप्पर सर्किटजवळ असल्यास, खरेदी करणं योग्य नाही, कारण किंमती पुन्हा घसरू शकतात ह्याचे संकेत मिळतात.

तुम्हाला हवा असलेल्या स्टॉकला लोअर सर्किट लागल्यास ती खरेदी करण्यासाठी चांगली वेळ असू शकते. त्याचप्रमाणे, एखादा स्टॉक अप्पर सर्किटच्या जवळ असल्यास त्याची विक्री करून नफा बुक करण्याची ही योग्य वेळ असू शकते.

कोणत्या कारणांमुळं लागू शकते अप्पर आणि लोअर सर्किट?

विलिनीकरण आणि अधिग्रहण

विस्तार, दिवाळखोरी आणि एकत्रीकरण

राजकीय अशांतता

व्यापार करारांमध्ये बदल

व्याजदरात बदल

कंपनीची आर्थिक कामगिरी

गुंतवणूकदारांचा विश्वास

घोटाळ्यांमुळं होणारे भावातील चढउतार

कंपनी विषयी आलेली एखादी नकारात्मक बातमी

अचानक पुरवठ्या झालेली वाढ

Whats_app_banner