What is Share Split : शेअर बाजारातील थरार हा केवळ भावातील चढ-उतारापुरता मर्यादित नसतो. त्या व्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी शेअर बाजाराबद्दल सर्वसामान्यांचं आकर्षण वाढवतात. गुंतवणूकदारांना मार्केटशी बांधून ठेवतात. स्टॉक स्प्लिट किंवा शेअर स्प्लिट म्हणजेच शेअरचं विभाजन हा यापैकीच एक प्रकार असतो. काय आहे ही संकल्पना जाणून घेऊया…
जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत खूप वाढते आणि तो शेअर सर्वांना परवडण्याजोगा राहत नाही, त्यावेळी कंपनी शेअरचं विभाजन (Stock Split) करण्याचा निर्णय घेते. स्टॉक स्प्लिटमुळं कंपनीच्या एकूण भांडवली मूल्यामध्ये (Market Capital) कोणतीही भर पडत नाही. मात्र, कंपनीचा शेअर सर्वसामान्यांना परवडण्याच्या भावापर्यंत येतो. स्टॉक स्प्लिट कसे कार्य करते आणि त्याचा गुंतवणूकदारांवर कसा परिणाम होतो ते पाहू या.
शेअरचं विभाजन करताना कंपनी आधी त्या विभाजनाचं प्रमाण ठरवते. उदा. १:२, १:५, १:१० असं ते कोणतंही प्रमाण असू शकतं. ज्या प्रमाणात शेअरचं विभाजन केलं जातं, त्या प्रमाणात शेअरचं दर्शनी मूल्य (Face Value) कमी होतं. जर शेअर विभाजनाचं प्रमाण १:५ असं असेल, तर प्रत्येक एका शेअरमागे पात्र शेअरहोल्डर्सना प्रत्येक ५ शेअर मिळतात.
शेअरच्या विभाजनाचा शेअरहोल्डरला एकूम मूल्याच्या बाबतीत काहीच फरक पडत नाही. मात्र, शेअरहोल्डर्सकडं असलेल्या संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होते. त्यातून तरलता वाढते. तर, शेअर स्प्लिट करणाऱ्या कंपनीचे तुम्ही विद्यमान शेअरहोल्डर नसल्यास, तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी किमतीत तो शेअर्स खरेदी करण्याची संधी मिळते.
उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत ४,५०० वर असेल. तो शेअर १:५ या प्रमाणात विभाजित झाला तर त्याची किंमत ९०० रुपयांपर्यंत खाली येते. त्यामुळं नवीन गुंतवणूकदारांना हा शेअर परवडू शकतो. कंपनीकडं अधिक गुंतवणूक आकर्षित होण्याचा मार्ग मोकळा होता. या अधिकच्या गुंतवणुकीचा फायदा शेअरचा भाव वाढून विद्यमान गुंतवणूकदारांना होऊ शकतो. तसंच, भविष्यात कंपनीनं बोनस शेअर्स दिल्यास वाढलेल्या शेअरच्या संख्येवर बोनस मिळतो.
स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतल्यानंतर कंपनीकडून रेकॉर्ड डेट आणि एक्स स्प्लिट डेट जाहीर केली जाते.
रेकॉर्ड डेट ही एक प्रकारे स्प्लिटसाठी पात्र ठरण्याची अंतिम तारीख असते. या तारखेला कंपनीच्या रेकॉर्डमध्ये ज्या शेअरहोल्डर्सची नोंद असते, तेच स्प्लिटसाठी पात्र ठरतात.
एक्स-स्प्लिट ही आणखी एक महत्त्वाची तारीख असते. या दिवशी संबंधित शेअर नवीन समायोजित स्प्लिट किंमतीवर (Adjusted Price) ट्रेडिंग सुरू करतो.
संबंधित बातम्या