मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Penny Stocks Explained : पेनी स्टॉक म्हणजे काय? त्यातील गुंतवणूक खरंच फायद्याची असते?

Penny Stocks Explained : पेनी स्टॉक म्हणजे काय? त्यातील गुंतवणूक खरंच फायद्याची असते?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 05, 2024 04:49 PM IST

What is Penny Stock : सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सर्वाधिक आकर्षण असलेला पेनी स्टॉक नेमका काय असतो? जाणून घेऊया…

What is Penny Stock?
What is Penny Stock?

Penny Stocks detail News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय असतात. कुणी आयपीओमध्ये गुंतवणूक करतात, कुणी आधीपासून लिस्टेड असलेल्या कंपन्यांचे शेअर घेतात, कुणी प्री-आयपीओ गुंतवणूक करतात तर कुणी आणखी एखादा पर्याय निवडतात. त्यापैकीच एक पर्याय असतो पेनी स्टॉकमधील गुंतवणूक.

पेनी स्टॉक हा छोट्या आणि कमी भांडवल असलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय ठरतो. मोठे गुंतवणूकदारही यात पैसे लावतात. मात्र, छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी संधी असते. मागच्या वर्षात अनेक पेनी स्टॉकनी गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला. यंदाच्या वर्षातही तशी शक्यता आहे. हा पेनी स्टॉक म्हणजे नेमकं काय असतं? काय आहे त्याची व्याख्या? त्यातील गुंतवणूक कितपत फायदेशीर असते? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया…

Bonus Share Explained : बोनस शेअर्स म्हणजे काय? ते का आणि कोणाला दिले जातात? जाणून घ्या सर्वकाही

पेनी स्टॉक आणि इतर सर्वसाधारण शेअरमध्ये अर्थाच्या दृष्टीनं फरक नसतो. फरक इतकाच की पेनी स्टॉकचं मूल्य खूप कमी असतं. काही वेळा ते अगदी नगण्य असतं. ते पैशांमध्येही असू शकतं. अशा कंपन्यांचं बाजार भांडवल खूपच कमी असतं. भारतीय शेअर बाजारात पेनी स्टॉकची किंमत अगदी १० रुपयांपेक्षाही कमी असते. हे स्टॉक खूपच जोखमीचे असतात. 

नशीब पालटण्याची क्षमता

पाश्चात्य बाजारपेठांमध्ये १ डॉलरपेक्षा कमी किंमतीच्या शेअर्सना पेनी स्टॉक म्हणतात. परंतु त्यात ५ डॉलरपेक्षा कमी किमतीच्या स्टॉकचा देखील समावेश असतो. पेनी स्टॉक हे अत्यंत जोखमीचे असतात हे खरं असलं तरी त्यापैकी काही स्टॉकमध्ये गुंतवणूकदाराचं नशीब पालटण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडं १ रुपया किंमतीच्या पेनी स्टॉकचे ५० हजार शेअर असतील आणि त्यात १ रुपयाची जरी वाढ झाली तरी एका दिवसात संंबंधित व्यक्तीला थेट ५० हजार रुपयांचा नफा होऊ शकतो. मोठ्या स्टॉकच्या बाबतीत हे शक्य नसते. कारण त्यांचे मूल्य जास्त असल्यानं ते मोठ्या संख्येत खरेदी करता येत नाहीत.

IPO Explainer : आयपीओ म्हणजे काय? जाणून घ्या स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीचा भन्नाट पर्याय

पेनी स्टॉक्समधील धोके

पेनी स्टॉक्समध्ये बरेच धोके सुद्धा असतात. या स्टॉकच्या किंमतीत अचानक मोठे चढ-उतार होतात. त्यात कृत्रिम चढउतार सहज केले जाऊ जातात. ते अचानक डिलिस्टि होऊ शकतात किंवा सेबीच्या छाननीला बळी पडू शकतात. एखादा धनाढ्य व्यक्ती असा एखादा स्टॉक हजारोंमध्ये खरेदी करून त्या स्टॉकच्या भावात मोठा फुगवटा आणू शकतो. ही तेजी खरी आहे की कृत्रिम हे सर्वसामान्य गुंतवणूकदाराला अनेकदा कळत नाही. त्यामुळं त्यास बळी पडून छोटे गुंतवणूकदार आपले पैसे गमावू शकतात. पेनी स्टॉक हे बऱ्याचदा राष्ट्रीय शेअर बाजाराकडून नियंत्रित केले जात नसल्यामुळं त्यात घोटाळे होण्याची अधिक शक्यता असते. यामुळंच स्टॉक एक्स्चेंज अशा प्रकारच्या स्टॉक्सला 'ट्रेड-टू-ट्रेड बास्केट' या वेगळ्या श्रेणीमध्ये ठेवतात. या श्रेणीमध्ये कोणत्याही इंट्राडे शेअर ट्रेडिंगला परवानगी नसते.

 

(डिस्क्लेमर : वरील लेखात पेनी स्टॉकची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही.)

WhatsApp channel