Understanding GMP : जीएमपी अर्थात ग्रे मार्केट प्रीमियम हा शब्द शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांच्या सतत कानावर पडत असतो. विशेषत: एखाद्या कंपनीचा आयपीओ लाँच झाला की त्या कंपनीच्या शेअरच्या जीएमपीची चर्चा होत असते. हा जीएमपी म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊया सविस्तर…
ग्रे मार्केट प्रीमियम किंवा जीएमपी ही एक अशी किंमत असते, ज्या किंमतीच्या आधारे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) अर्थात आयपीओ स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध होण्याआधी व्यवहार केले जातात. अधिक सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी-विक्रीची किंमत आणि प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) साठी कंपनीनं निश्चित केलेली किंमत यांच्यातील फरक म्हणजे जीएमपी असतो.
सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास IPO आणणाऱ्या कंपन्या लिस्टिंगच्या आधी ग्रे मार्केटमध्ये एकूण परिस्थितीचा अंदाज घेतात. एखादा शेअर लिस्टिंगच्या दिवशी कशी कामगिरी करेल याचा निदर्शक हा GMP असतो.
उदाहरणार्थ, LIC नं आयपीओ आणला आणि त्याची इश्यू प्राइस ९० रुपये प्रति शेअर निश्चित केलेली असेल आणि त्याचा आयपीओ जीएमपी ५० आहे असं मानलं तर या कंपनीचा शेअर १४०.९० रुपयांवर सूचीबद्ध होईल असं मानलं जातं. ज्यामुळं गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशी ५५ टक्क्यांपर्यंत नफा होण्याची शक्यता असते.
शेअर बाजारातील शेअर्सच्या मागणीनुसार, जीएमपीचं मूल्य दररोज बदलतं. जर सूचीबद्ध होण्यापूर्वी समभागांना जोरदार मागणी असेल तर शेअर्स जास्त नफ्यावर लिस्ट होऊ शकतात आणि जर बाजारात शेअर्सना फारसा प्रतिसाद नसेल तर शेअर्स नकारात्मक म्हणजे मूळ किंमतीच्याही खाली घसरून खुले होऊ शकतात.
'ग्रे' मार्केट हे समांतर अनौपचारिक मार्केट म्हणून काम करतं. एखादा शेअर स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होण्याआधी गुंतवणूकदार ग्रे मार्केटमध्ये त्यावर व्यवहार करतात. ग्रे मार्केटमध्ये, समभागांची खरेदी रोखीनं आणि वैयक्तिकरित्या केली जाते. ग्रे मार्केटमधील व्यापार सहसा फोनवर केला जातो आणि परस्पर विश्वासावर आधारित असतो. तर, आयपीओ बाजार हा बाजारातील भांडवल उभारणीसाठी सेबी-नियमित आणि मान्यताप्राप्त मार्ग आहे.
ग्रे मार्केट हे अधिकृत किंवा नियंत्रित नसतं. स्टॉक एक्स्चेंज, सेबी आणि ब्रोकर्सचा ग्रे मार्केटमध्ये होणाऱ्या कोणत्याही व्यवहारात कोणताही सहभाग किंवा पाठिंबा नसतो. ग्रे मार्केटमध्ये काही उलटसुलट घडल्यास किंवा शेअर पडल्यास गुंतवणूकदारांना कायदेशीर दाद मागण्याचा कुठलाही मार्ग नसतो. त्यामुळंच हे मार्केट जोखमीचं असतं.
GMPR = GMP*Q
Q हा प्राथमिक बाजारात विकल्या गेलेली शेअर्सची संख्या असते.
संबंधित बातम्या