ई-सॉप (Esop - Employee Stock Ownership Plan) अर्थात, कर्मचारी स्टॉक मालकी योजना ही संकल्पना स्वयंस्पष्ट आहे. कर्मचाऱ्यांना संस्थेमध्ये मालकी हक्क देण्याचा पर्याय म्हणजे ई-सॉप. हा एक प्रकारे पगाराव्यतिरिक्त मिळणारा लाभ असतो.
ई-सॉप अंतर्गत दिला जाणारा लाभ थेट शेअरच्या स्वरूपात, नफ्याचा भाग म्हणून किंवा बोनस म्हणून दिला जातो. या पर्यायांचा लाभ कोणत्या कर्मचाऱ्यांना द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार कंपनी मालकाचा किंवा व्यवस्थापनाचा असतो. अर्थात, हा लाभ ऐच्छिक असतो. या योजनेअंतर्गत विशिष्ट तारखेच्या आधी ठरलेल्या किंमतीवर खरेदी करता येतात. कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देताना कंपनी मालकाला कंपनीच्या नियमांचं पालन करावं लागतं.
ऑप्शन पीरियड (विशिष्ट कालावधी) नंतर कंपनीचे ठराविक शेअर्स खरेदी करण्यासाठी एखादी संस्था तिच्या कर्मचाऱ्यांना ESOP मंजूर करते. कर्मचाऱ्याला या पर्यायाचा लाभ घेण्यासाठी कंपनीनं निश्चित केलेला कालावधी पूर्ण करावा लागतो. म्हणजेच, ESOP चा पूर्ण किंवा अर्धा लाभ (आधी ठरल्याप्रमाणे) घेईपर्यंत कर्मचाऱ्याला संस्थेसाठी काम करावं लागतं.
कर्मचारी त्यांच्या ESOP चा वापर करून बाजार मूल्यापेक्षा कमी असलेल्या किमतींवर कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतात. ESOPs द्वारे खरेदी केलेले शेअर्स विकून त्यातून नफा कमावण्याचीही कर्मचाऱ्याला मुभा असते.
जर कर्मचारी निश्चित कालावधीच्या आधी कंपनी सोडून निघून गेला किंवा निवृत्त झाला, तर कंपनीला ६० दिवसांच्या आत वाजवी बाजारभावानं ESOP परत खरेदी करणं आवश्यक असतं.
भारतातील एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लान (ESOP) च्या सुरुवातीच्या खर्चात कायदेशीर फी, अकाउंटिंग फी आणि प्रशासकीय खर्च समाविष्ट केले जाऊ शकतात.
जेव्हा एखादा कर्मचारी शेअर्स मिळविण्यासाठी त्यांच्या स्टॉकचा पर्याय वापरतो, तेव्हा त्यांच्याकडे ते ताबडतोब विकण्याचा किंवा भविष्यातील मूल्यवृद्धीसाठी संग्रहित करण्याचा पर्याय असतो.
कर्मचाऱ्यानं शेअर्स विकण्याचा निर्णय घेतल्यास त्यातून झालेल्या नफ्यावरील कर कापून उरलेली रक्कम त्याला पाठवली जाते. जर कर्मचाऱ्यानं शेअर्स होल्ड करण्याचा निर्णय घेतला तर तो कंपनीचा अंशत: मालक होतो आणि शेअरची किंमत वाढल्यास तो लाभांश किंवा भांडवली नफ्यासाठी पात्र ठरतो.
उच्च-गुणवत्तेच्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी संस्था अनेकदा कर्मचारी स्टॉक मालकी योजना वापरतात. बऱ्याचदा कंपन्या टप्प्याटप्प्यानं हे शेअर्स वितरीत करतात. उदाहरणार्थ, एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्षाच्या शेवटी स्टॉक मंजूर करू शकते, जेणेकरून हा लाभ मिळवण्याच्या उद्देशानं कर्मचारी कंपनी सोडत नाही. ईएसओपी ऑफर करणाऱ्या कंपन्यांची उद्दिष्टे दीर्घकालीन असतात.
बऱ्याच आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी सोडून जाण्याचं प्रमाण (ॲट्रिशन रेट) चिंताजनक आहे. ESOP च्या माध्यमातून त्यांना थांबवता येऊ शकतं. बऱ्याचदा कंपन्यांकडं कॅशची देखील चणचण असते. त्यामुळं कर्मचाऱ्यांना भरघोस पगार देता येत नाही. अशावेळी कंपनीत हिस्सा देऊन ती उणीव भरून काढण्याकडं कंपन्यांचा कल असतो.
ESOPs मुळं कर्मचाऱ्याला नाममात्र दरात कंपनीचे शेअर्स घेण्याचा आणि त्यांची विक्री (त्याच्या नियोक्त्यानं निश्चित केलेल्या मुदतीनंतर) करून नफा मिळवण्याची संधी मिळते. कंपन्यांच्या संस्थापकांबरोबरच त्या कंपन्यांचे कर्मचारी देखील कोट्यधीश झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यातील एक गुगलचं आहे. Google ही कंपनी जेव्हा शेअर बाजारात लिस्ट झाली, तेव्हा तिचं मूल्य वाढून कंपनीचे संस्थापक सर्गे ब्रिन आणि लॅरी पेज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. त्याचबरोबर कंपनीचे शेअर असलेल्या कर्मचाऱ्यांनीही कोट्यवधी रुपये कमावले.
ESOPs चे दुहेरी कर प्रभाव आहेत:
जेव्हा एखादा कर्मचारी त्यांचे अधिकार वापरतो आणि कंपनीचा स्टॉक खरेदी करतो
जेव्हा कर्मचारी स्टॉक खरेदी केल्यानंतर त्याची विक्री करतो
तथापि, नवीन व्यवसायांच्या बाबतीत, सरकारनं ESOPs वरील करभार काहीसा शिथील केला आहे. स्टार्ट-अपमधील कर्मचाऱ्यांनी ज्या वर्षी ESOP चा वापर केला, त्या वर्षातील लाभावर कर भरावा लागत नाही.
संबंधित बातम्या