माझ्या एका मित्राने वयाच्या पन्नाशीत नोकरीतून सेवानिवृत्ती घेतली होती. शरीर सक्रिय असतानाच जीवनाचा उत्साहाने आनंद लुटावा, हा हेतू त्यामागे होता. पण निवृत्तीनंतर मिळालेला भरपूर मोकळा वेळ कसा घालवावा, हा प्रश्न त्याला सतावत होता. बदल म्हणून एखादा लहानसा व्यवसाय सुरु करण्यास मी त्याला सुचवले. त्यावर तो गडबडून म्हणाला, “छे छे! ते व्यवसायाचे वगैरे मला काही जमणार नाही. तरुण असतो तर गोष्ट निराळी. आयुष्याची २५ वर्षे नोकरीत घालवल्यावर अनोळखी क्षेत्रात मी तरी नाही उतरणार.” त्यावर मी म्हणालो, “अरे माझ्या बाबांनी असाच विचार केला असता तर आज आमचा अदील उद्योग समूहही तयार झाला नसता आणि कदाचित मीसुद्धा तुला कुठेतरी नोकरी करताना आढळलो असतो.”
मी एकदा माझ्या बाबांना विचारलेही होते, की संपूर्ण नव्या अशा धंद्याच्या क्षेत्रात उतरताना तुम्हाला भीती वाटली नाही का? त्यावर ते म्हणाले, “धाडसाला किंवा नवे शिकायला वयाची मर्यादा नसते. उलट जितके वय जास्त तेवढा माणूस डोळस असतो. अनुभवातून पैशाची किंमत समजल्याने झेपेल इतकीच जोखीम (कॅल्क्युलेटेड रिस्क) घेतो.
व्यवसायाची संधी जीवनात कधीही मिळाली तरी ती सोडायची नसते.” याला पुष्टी देणारी अमेरिकेतील एका उद्योगपतीची अशीच प्रेरणादायक कहाणी मी वाचली आहे. हा माणूस एका कंपनीच्या लेखा (अकाऊंट्स) विभागात कारकून होता. त्याला मनातून खरे तर व्यवसाय करण्याची ओढ होती. पण घरी एकटाच कमावता असल्याने त्याला नोकरी सोडता येत नव्हती. वर्षानुवर्षे काम केल्यानंतर वयोमानानुसार तो एक दिवस सेवानिवृत्त झाला. पण त्याला चैन पडेना. त्याने नोकरीत असताना कंपनीच्या विक्रेत्यांशी चर्चा करुन विक्रीवाढीसाठी एक अभिनव विपणन प्रारुप मनात आखले होते आणि ते त्याला राबवून बघायचे होते. त्यासाठी तो अनेक कंपन्यांत आपणहून जाऊन भेटू लागला, पण त्याच्या बोलण्यावर कुणीच विश्वास ठेवेना. तो निवृत्त कारकून असल्याचे समजताच लोक योजना समजून घेण्याआधीच त्याला वाटेला लावायचे. तरीही तो हिंमत न हारता चिकाटीने लोकांपुढे आपली कल्पना मांडत राहिला.
एका रेस्टॉरंट कंपनीला आपल्या ब्रँडचा परदेशात विस्तार करायचाय, असे समजल्यावरुन हा माणूस थेट त्या कंपनीच्या मालकांना जाऊन भेटला. आधी दोन-तीन वेळा नकार दिल्यावर अखेर एक संधी देऊन बघावी म्हणून त्यांनी या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि नफा झाल्यास त्यातील हिस्सा देण्याचे आश्वासन दिले. या माणसाने खरोखर चमत्कार घडवला. त्याच्या विपणन योजनेमुळे रेस्टॉरंटची साखळी परदेशांतही झपाट्याने वाढून लोकप्रिय ठरली. या कहाणीतील विशेष भाग असा, की ज्या माणसामुळे हे सर्व घडले तो निवृत्तीनंतर अवघी १२ वर्षे जगला, पण डोळे मिटण्यापूर्वी त्याने उद्योजक बनण्याचे आपले स्वप्न यशस्वी साकार केलेच.
मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धात जपानला पराभूत केल्यानंतर विजेत्या अमेरिकेपुढे एक वेगळेच आव्हान उभे राहिले. ते म्हणजे जपानी जनतेला पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्याचे. युद्धाच्या भीषणतेमुळे जपानच्या तरुणाईची मने भग्न झाली होती. जपानला विकासाच्या वाटेवर न्यायचे तर प्रथम या नव्या पिढीला वैफल्यग्रस्ततेतून बाहेर काढणे अत्यंत जरुरीचे होते. युद्धोत्तर जपानच्या पुनर्रचनेची जबाबदारी सांभाळणाऱ्या जनरल डग्लस मॅक्आर्थर यांच्या मनात सतत हा विचार घोळत असे. अशावेळी त्यांच्या मदतीला आली ती सॅम्युअल उलमन् या अमेरिकन कवीची ‘यूथ’ ही कविता.
सॅम्युअल उलमन हे एक उद्योजक होतेच, परंतु कवी आणि मानवतावादीही होते. जनरल मॅक्आर्थर यांनी त्यांना प्रेरणा देणारी ही कविता स्वतःच्या कार्यालयात सर्वांना दिसेल अशी लावली होती. तेथून तिचा प्रसार झाला आणि बघता बघता लोकांना इतकी आवडली, की जपानने सॅम्युअल उलमनना आपलेसे मानले. जपानी तरुणाईने या कवितेतूनच स्फूर्ती घेतली. पुढच्या दोन-तीन दशकांतच जपान अफाट कष्ट व श्रमसंस्कृतीच्या जोरावर एक समर्थ राष्ट्र म्हणून पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहिला. ‘यूथ’ या कवितेत तारुण्याचा खरा अर्थ छान वर्णन केला आहे. या त्यातील दोन ओळींचा अनुवाद मुद्दाम नमूद करावासा वाटतो.
‘तारुण्य म्हणजे भीतीवर धैर्याचे मानसिक वर्चस्व. सुखासीनतेवर साहसी भावनेचे वर्चस्व. आणि हे बहुधा विशीच्या तरुणापेक्षा साठीच्या व्यक्तीतच दिसून येते. वय वाढले म्हणून कुणी वृद्ध होत नसतो. आपण तेव्हाच वृद्ध होतो, जेव्हा आपण आपल्या ध्येयापासून दूर जातो. काळानुसार त्वचेला सुरकुत्या पडतात, पण आपल्यातील उत्साह टाकून दिला तर आत्म्याला सुरकुत्या पडतात.’