ESIC Scheme News : कर्मचारी राज्य विमा महामंडळानं (ESIC) नियमांमध्ये मोठे बदल करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. उच्च वेतनामुळं ईएसआय योजनेचा लाभ घेऊ न शकणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या ESIC बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
ज्या कर्मचाऱ्याचं मासिक उत्पन्न २१ हजार रुपये किंवा त्याहून कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना सध्या कर्मचारी राज्य विमा योजनेचा लाभ मिळतो. तर शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी किमान वेतनमर्यादा २५ हजार रुपये प्रति महिना आहे. या योजनेत कर्मचारी आणि कंपनी दोघांचेही योगदान आहे.
१ एप्रिल २०१२ नंतर किमान पाच वर्षे ESI योजनेत समाविष्ट नोकरीत असलेल्या आणि १ एप्रिल २०१७ किंवा त्यानंतर ३० हजार रुपये प्रति महिना पगार असताना निवृत्त झालेल्या किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळेल.
सेवानिवृत्त कर्मचारी आणि कायमस्वरूपी अपंग विमाधारक व्यक्ती आणि त्यांच्या जोडीदारांना वार्षिक १२० रुपयांच्या प्रीमियमवर वैद्यकीय सेवा मिळेल. विमाधारक व्यक्तीच्या उपचारावरील खर्चाला कमाल मर्यादा नाही.
कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना ESI कार्ड दिले जातात. कार्डधारक कर्मचारी ईएसआय दवाखाना किंवा रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकतात. ESIC ची देशभरात १५० हून अधिक रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये सामान्य आजारांपासून गंभीर आजारांवर उपचाराची सुविधा मिळते.
ESI अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आयुष २०२३ धोरण आणण्याचा निर्णयही घेण्यात आला. हे धोरण सर्व ESIC केंद्रांवर लागू केले जाईल. या अंतर्गत ईएसआयसी रुग्णालयांमध्ये पंचकर्म, क्षारसूत्र आणि आयुष युनिट सुरू केले जातील.
संबंधित बातम्या