
Servotech Power Systems Share price : इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जर बनवणाऱ्या सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीचा शेअर सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये आज किंचित घसरण झाली असली तरी ही तात्पुरती असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे. आगामी काळात या शेअरमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. कंपनीनं केला नवा करार त्यासाठी कारण ठरेल असं मानलं जात आहे.
भारतातील सर्वात मोठी ईव्ही चार्जर उत्पादक कंपनी सर्वोटेक पॉवर सिस्टीम लिमिटेडनं मोठी डील केली आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरनं १११ टक्के आणि या वर्षी आतापर्यंत १४१ टक्के परतावा दिला आहे. या शेअरमध्ये वर्षभरात १३५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. पाच वर्षांत त्यात ७ हजारांहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत शेअरची किंमत २ रुपयांपासून आताच्या १९१ रुपयांवर गेली आहे.
भारतातील सर्वात मोठी ईव्ही चार्जर उत्पादक कंपनी सर्वोटेक पॉवर सिस्टिम्स लिमिटेडनं ईव्ही चार्जर वितरक नेटवर्कसाठी ब्रिटनस्थित एनमार्ट पॉवरसोबत करार केला आहे. या करारामुळं इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळणार आहे. ग्राहकांसाठी विश्वासार्ह आणि सुलभ चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रदान करणं हे या कराराचं उद्दिष्ट आहे.
जागतिक दर्जाचे ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्स पुरवणं हे सर्वोटेकचं उद्दिष्ट आहे. नव्या भागीदारीमुळं आम्हाला एनस्मार्ट पॉवरच्या जागतिक कौशल्याचा वापर करता येईल आणि नाविन्यपूर्ण चार्जिंग सोल्यूशन्सच्या वाढती मागणी पूर्ण करता येईल, असा विश्वास सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक रमण भाटिया यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या
