Business Ideas: उद्योग-व्यवसाय करताना वागण्या-बोलण्यात तारतम्य ठेवा...
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas: उद्योग-व्यवसाय करताना वागण्या-बोलण्यात तारतम्य ठेवा...

Business Ideas: उद्योग-व्यवसाय करताना वागण्या-बोलण्यात तारतम्य ठेवा...

HT Marathi Desk HT Marathi
Jan 21, 2025 02:52 PM IST

Business Ideas : मनुष्याने आपले वर्तन आणि वाणी याबाबत नेहमी तारतम्य बाळगले पाहिजे. एकदा जीभ सैल सुटली की तिला धरबंध राहात नाही. पुढे त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात.

उद्योग-व्यवसाय करताना कसे बोलावे, कसे वागावे
उद्योग-व्यवसाय करताना कसे बोलावे, कसे वागावे

 

धनंजय दातार

माझे बाबा घराबाहेर बोलक्या स्वभावाचे तर घरी मितभाषी होते. दुकानात असताना ते ग्राहकांशी आणि पुरवठादारांशी मोकळेपणाने बोलत, पण आम्ही कुटुंबातील सदस्य असुनही ते आमच्याशी मोजके बोलत. माझ्या व्यावसायिक कारकीर्दीच्या सुरवातीला एकदा आम्ही दोघे एका कंपनीत पुरवठ्यासंबंधी बोलणी करायला गेलो होतो. तेथे मी उत्साहाने आमच्या व्यवसायाबाबत सविस्तर माहिती देत होतो. बाबा शांत होते. परत येताना ते मला म्हणाले, “ग्राहकांशी सौजन्याने बोलणे, त्यांच्या गरजा जाणून घेणे आणि उत्पादनांची सविस्तर माहिती देणे, ही व्यवसायाची मूलभूत पूर्वअट आहे, पण म्हणून आपण नेहमी वाचाळ राहावे, असे नाही. कुठे, कसे आणि किती बोलायचे याचे तारतम्य आपल्याला असायला हवे. शांत राहण्याने फायदा होतो आणि जास्त बडबडीने तोटा होतो. आजच्या मीटिंगमध्ये तू एकटाच जास्त बोलत होतास. असे करु नकोस. त्यांनी विचारले तितकेच सांगत जा.” 

बाबांनी मला त्यांच्या एका मित्राचे उदाहरण दिले. हा माणूस मुंबईत एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याला अघळ-पघळ बोलण्याची व लोकांना किस्से सांगून हसवण्याची सवय होती. पण त्यातूनच पुढे गंमत अंगाशी आली. लोक आपल्या विनोदांमुळे हसतात म्हटल्यावर हा मित्र कंपनीतील वरिष्ठांच्या लकबींच्या नकला करु लागला. एक वरिष्ठ अधिकारी किंचित नेत्रदोष असणारे आणि जीभ जड असणारे होते. हा मित्र त्यांची सहकाऱ्यांमध्ये ‘चकणा’ व ‘बोबडकांदा’ म्हणून संबोधून टिंगल करत असे. एकदा कुणीतरी हे त्या अधिकाऱ्यांच्या कानावर गुपचूप घातले. ते गृहस्थ समंजस होते. त्यांनी या नकलाकाराला बोलवून सौम्य शब्दांत समज दिली, की “निसर्गाने माझ्यावर अन्याय केला असला तरी किमान समाजाने मला हिणवू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे. माझे व्यंग कामाच्या आड येत नसताना तुम्ही त्याची चेष्टा का करता? वेळीच जिभेला आवर घाला, अन्यथा एक दिवस अडचणीत याल.” पण त्या समजावणीचा काहीही परिणाम झाला नाही. पुढे बेजबाबदार वागण्याचा ठपका ठेऊन कंपनीने काही कर्मचाऱ्यांना काढून टाकले त्यात याचाही समावेश होता. त्याच्या मदतीला कुणीही आले नाही. 

या उपदेशातून बोध घेऊन मी ठरवून टाकले, की ग्राहक व आपल्या कर्मचाऱ्यांशी सौजन्याने आणि मोकळेपणाने बोलायचे, बिझनेस मीटिंग्जमध्ये कामापुरते व मोजके बोलायचे आणि व्यापारी वर्तुळात समव्यावसायिकांशी बोलताना मात्र गप्प बसायचे. बाबांनी उल्लेख केलेल्या घटनेसारखे आणखी एक उदाहरण मी दुबईत प्रत्यक्ष पाहिले. जगातील आघाडीच्या पाच बँकांत समावेश असलेल्या एका बँकेचा एक व्यवस्थापकीय संचालक होता. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या या माणसाला गॉसिपिंगची सवय होती. गप्पांच्या ओघात हा माणूस त्याच्या सहवासात आलेल्या लोकांच्या खासगी गोष्टी, सवयी रंगवून सांगत असे. हळूहळू ही गोष्ट बँकेच्या ग्राहकांना विशेषतः काही अतिश्रीमंत क्लायंटना समजल्यावर ते सावध झाले. हा माणूस बोलण्याच्या नादात आपल्या ठेवी अथवा खात्यातील व्यवहारांबाबत इतरांना माहिती देईल, अशी भीती त्यांना वाटू लागली. त्यांनी सरळ आपली खाती त्या बँकेतून बंद करुन अन्य बँकांत उघडली. एका अधिकाऱ्याच्या वाचाळपणाचा फटका बँकेच्या बिझनेसला बसला. 

केवळ बोलणे नव्हे तर चार चौघात वागण्याबाबतही तारतम्य राखावे लागते. आम्ही एकदा चीनमध्ये गेलो होतो. तेथे एका रेस्टॉरंटमध्ये कामावर असलेला कुक चीनी नसून नेपाळी होता. आम्ही भारतातून आल्याचे समजल्यावर त्याला खूप आनंद झाला आणि त्याने आमच्याशी हिंदीमध्ये संभाषण सुरु केले. विचारपुशीपर्यंत ठीक होते, पण नंतर त्याचा उत्साह इतका वाढला, की तो खुशाल हातातील काम सोडून आमच्या टेबलवर येऊन बसला आणि ड्रिंक घेऊ लागला. त्याच्या सहकाऱ्यांनी किचनमधील कामाची आठवण करुन दिल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करुन तो तिथेच बसला. त्याचा उर्मटपणा बघून रेस्टॉरंटच्या मालकाच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली आणि आम्हालाही त्याच्या बेफिकीरीमुळे संकोचल्यासारखे झाले. अखेर आम्ही त्याची कानउघाडणी केली की परदेशात राहताना आपण तेथील शिष्टाचारांचे काटेकोर पालन केले पाहिजे. आपल्या मालकाची किंवा ग्राहकांची अडचण होईल असे वागू नये. विशेषतः कामाचा खोळंबा करुन गप्पा मारत बसणे योग्य नाही.

बोलण्याच्या तारतम्याचे महत्त्व सांगणारे एक सुभाषित आहे, की

जिव्हे प्रमाणं जानीहि भोजने भाषणेऽपि च ।

अतिभुक्तिरतीवोक्तिः सद्यः प्राणापहारिणी ॥

(अर्थ – हे जिभे, तुझे खाणे आणि बोलणे जरा प्रमाणशीर असू देत. अति खाणे व वायफळ बोलणे यामुळे प्रसंगी प्राणावर बेतू शकते.)

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहे)

Whats_app_banner