Multibagger Stock : अवघ्या एका वर्षांत १ लाख रुपयांचे ४ कोटी करणारी इराया लाइफस्पेस ही कंपनी आता आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी शेअरचं विभाजन (Stock Split) करण्याच्या विचारात असून याच आठवड्यात यावर अंतिम निर्णय होणार आहे. विभाजन झाल्यास जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना हा मल्टीबॅगर स्टॉक घेता येणार आहे.
इराया लाइफस्पेसच्या शेअरमध्ये आजही मोठी तेजी दिसून आली. आज दिवसभरात चढउतार होऊन हा शेअर अखेर १.८६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. हा शेअर आज इंट्राडे उच्चांकी पातळीवर म्हणजेच, २९८१ रुपयांवर पोहोचला. शेअर विभाजनाची शक्यता हे कारण या तेजीमागे आहे.
या आठवड्याच्या अखेरीस कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. शनिवारी, १९ ऑक्टोबर रोजी मंडळाच्या सदस्यांची बैठक होणार आहे. गुंतवणुकीला चालना देण्याबरोबरच शेअर विभाजनाच्या माध्यमातून खेळतं भांडवल वाढविण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.
कंपनीनं आज स्टॉक एक्सचेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. 'विभाजनाबाबत निर्णय घेण्यासाठी इराया लाइफस्पेस लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची बैठक शनिवार, १९ ऑक्टोबर २०२४ रोजी नवी दिल्ली इथं होणार आहे. तरलता वाढविणे आणि गुंतवणूकदारांच्या चांगल्या सहभागास प्रोत्साहित करणे हे उद्दिष्ट आहे. शेअर विभाजनाव्यतिरिक्त अरुण बत्रा यांची संचालक (Operations) आणि विवेक दवे यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती, ईएसजी समितीची स्थापना आणि सर्वसमावेशक ईएसजी धोरणांचा अवलंब करणे, व्यावसायिक घडामोडींचा आढावा घेणं आणि टीपीओ इंडिया या बाह्य तज्ञ गटाच्या अहवालाचा विचार करणं यासारख्या इतर अनेक विषयांचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. रॉबिन रैनाविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या चौकशीच्या प्रगती अहवालाचा देखील विचार केला जाणार आहे आणि उपकंपनी एबिक्स इंकच्या रचनेवर पुनर्विचार केला जाणार आहे.
इराया लाइफस्पेसचा शेअर चालू कॅलेंडर वर्षात आतापर्यंत २३९९ टक्क्यांनी वधारला आहे. तर, मागच्या वर्षभरात हा शेअर ६८७० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. वर्षभरापूर्वी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या शेअरची किंमत एनएसईवर ४१.६८ रुपये होती ती आज २९०५.३० रुपये झाली आहे. पाच वर्षांत या शेअरनं जवळपास ३९,००० टक्क्यांपर्यंत दमदार परतावा दिला आहे. ३० जुलै २०२० रोजी शेअरची किंमत ७ रुपये होती. त्यावेळची एक लाख रुपयांची गुंतवणूक वाढून आज ४ कोटींहून अधिक झाली आहे. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी हा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर ३१६९ रुपयांवर पोहोचला होता, तर १३ ऑक्टोबर २०२३ रोजी तो ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ४०.८७ रुपयांवर होता.