EPFO membership surges : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) जून २०२४ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ मध्ये ८.८७ लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली. ही वाढ आधीच्या महिन्यांच्या तुलनेत लक्षणीय आहे. रोजगारात वाढ झाल्याचं हे लक्षण आहे.
ईपीएफओमधून बाहेर पडलेल्या आणि नंतर पुन्हा प्रवेश केलेल्या सदस्यांच्या संख्येत २३ टक्के वाढ झाली आहे. दीर्घकालीन आर्थिक स्थैर्याबाबत नोकरदारांच्या जागरूकतेचं हे निदर्शक आहे.
कमीतकमी जोखमीसह जास्तीत जास्त व्याज देणाऱ्या गुंतवणुकीचा पर्यायाच्या शोधात असाल तर तुमच्या कमाईचा काही भाग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यांत वळवणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळं दीर्घकाळात मोठा निधी जमा होऊ शकतो.
भारतातील कर्मचाऱ्यांना ईपीएफओ दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ईपीएफओ नेमकं काय करते?
ईपीएफ खात्यात सहभागी होण्यासाठी मालक आणि कर्मचारी या दोघांकडून सातत्यपूर्ण योगदान आवश्यक असतं. यातून आर्थिक शिस्त लागते आणि सदस्याच्या नकळत दीर्घकाळ बचत होत जाऊन एक भरभक्कम सेवानिवृत्ती निधी जमा होतो.
दरवर्षी, केंद्र सरकार ईपीएफ योगदानासाठी व्याज दर निश्चित करते. पारंपारिक बचत खात्यांवर मिळणाऱ्या व्याज दरापेक्षा हा दर जास्त असतो. त्यामुळं ही गुंतवणूक सुरक्षित, विश्वासार्ह पर्यायाबरोबरच तुलनेनं अधिक फायदा देते.
नियोक्ता आणि कर्मचारी दोघांनीही ईपीएफ खात्यांमध्ये केलेल्या योगदानावर विशिष्ट मर्यादेपर्यंत कर सवलत मिळते. यामुळं कर्मचाऱ्यांवरील कराचा बोजा कमी होऊन सेवानिवृत्तीची बचत वाढण्यास मदत होते.
> दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यासह ईपीएफओ देत असलेले इतर फायदे
पात्र कर्मचारी कर्मचारी पेन्शन योजनेच्या (EPS) माध्यमातून निवृत्तीनंतर मासिक पेन्शन प्राप्त करू शकतात. यातून कर्मचाऱ्यांना जास्तीची सामाजिक सुरक्षा मिळते.
ईपीएफओ कर्मचारी ठेव संलग्न विमा (EDLI) योजनेद्वारे सदस्यांना जीवन विमा लाभ प्रदान करते. सेवेच्या कालावधीत एखाद्या सदस्याचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून एकरकमी रक्कम मिळते.
सदस्यांना वैद्यकीय आणीबाणी, मुलांसाठी शैक्षणिक खर्च किंवा घर खरेदी यासह विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या ईपीएफ बचतीचा काही भाग काढण्याचा पर्याय आहे.
ईपीएफओ एक मजबूत सामाजिक सुरक्षेची हमी देऊन सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करते. शिस्तबद्ध बचतीस प्रोत्सान देते, स्पर्धात्मक परतावा देते आणि पेन्शन व विमा कव्हरेज सारखे अतिरिक्त फायदे देते.
संबंधित बातम्या