EPF withdrawal news : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) संबंधित काही महत्त्वाचे बदल करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठी सरकार नवी योजना जाहीर करणार आहे. ही योजना ग्राहकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असेल. कारण, या योजनेच्या अंतर्गत पीएफचे पैसे काढण्यासाठी एटीएमचा पर्यायही दिला जाण्याची शक्यता आहे.
सीएनबीसीनं या संदर्भात वृत्त दिलं आहे. त्यानुसार, ईपीएफओ ग्राहकांना एटीएमद्वारे थेट पीएफ काढण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो. एटीएमच्या माध्यमातून पीएफ काढण्यासाठी कामगार मंत्रालय कार्ड जारी करण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं जात आहे.
भविष्य निर्वाह निधीतील (PF) कर्मचाऱ्यांच्या योगदानावरील १२ टक्के मर्यादा ईपीएफओकडून काढून टाकली जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांच्या बचतीच्या नियोजनानुसार व स्वत:च्या प्राधान्याक्रमानुसार पीएफ खात्यात योगदान देण्याची सुविधा मिळू शकते. ही योजना सध्याच्या मर्यादेपेक्षा जास्त ठेवींना परवानगी देऊ शकते. मात्र, हा प्रस्ताव प्राथमिक चर्चेच्या टप्प्यात आहे.
सध्या ईपीएफओ सदस्यांच्या पगाराच्या १२ टक्के रक्कम (मूळ वेतन आणि महागाई भत्ता) ईपीएफ खात्यात जाते. कर्मचाऱ्याच्या १२ टक्के योगदानापैकी ८.३३ टक्के रक्कम ईपीएस ९५ (Employee Pension Scheme) मध्ये जाते, तर उर्वरित ३.६७ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा होते. सूत्रांच्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी सरकार सामाजिक सुरक्षेचे फायदे जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवण्याबरोबरच देशात रोजगार निर्मितीवरही लक्ष केंद्रित करत आहे.