pf interest rate : कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर! पीएफवरील व्याज वाढणार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  pf interest rate : कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर! पीएफवरील व्याज वाढणार

pf interest rate : कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर! पीएफवरील व्याज वाढणार

Feb 10, 2024 03:59 PM IST

EPFO News Updates : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं २०२३-२४ या वर्षासाठीचा व्याजदर निश्चित केला आहे.

EPF interest Rate
EPF interest Rate

EPFO News Updates : देशातील ६ कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पीएफवर ८.२५ टक्के व्याजदर निश्चित केला आहे. मागच्या तीन वर्षातील हा उच्चांकी व्याजदर आहे.

मार्च २०२३ मध्ये ईपीएफओनं २०२२-२३ या वर्षासाठी ईपीएफवरील व्याजदर किंचित वाढवून तो ८.१५ टक्के केला होता. २०२१-२२ या वर्षात तो ८.१० टक्के इतका होता. १९७७-७८ नंतरचा हा सर्वात कमी व्याजदर होता.

ईपीएफओच्या संदर्भातील निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) शनिवार, १० फेब्रुवारी रोजी बैठक झाली. या बैठकीत २०२३-२४ साठी ८.२५ टक्के व्याज दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

सीबीटीनं २०२३-२४ साठी निश्चित करण्यात आलेला ईपीएफवरील व्याजदराचा प्रस्ताव संमतीसाठी अर्थ मंत्रालयाकडं सादर केला जाईल. सरकारनं मान्यता दिल्यानंतर सहा कोटींहून अधिक ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होईल.

काय आहे व्याजदराचा इतिहास?

मार्च २०२० मध्ये ईपीएफओनं २०१९-२० या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर ७ वर्षांच्या नीचांकी पातळीवर ८.५० टक्क्यांवर आणला होता. २०१८-१९ मध्ये हाच दर ८.६५ टक्के होता.

गेल्या काही वर्षांत ईपीएफओच्या व्याजदरात तफावत दिसून आली असून, २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के आणि २०१५-१६ मध्ये ८.८ टक्के इतका दर होता. 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये ८.७५ टक्के, तर २०१२-१३ मध्ये ८.५ टक्के, तर २०११-१२ मध्ये ८.२५ टक्के व्याजदर दिला होता.

Whats_app_banner