Employee Provident Fund Interest rate News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ खातेधारकांना जाहीर केलेल्या ८.१५ टक्के व्याजदरास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. सुमारे ७ कोटी खातेधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
ईपीएफओनं या संदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. ईपीएफओनं २८ मार्च रोजी ईपीएफवरील व्याजदराचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडं मंजुरीसाठी पाठवला होता. त्यानुसार आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत व्याजात ०.०५ टक्के वाढ सुचवली होती. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ईपीएफचा व्याजदर ८.१० टक्के होता. तो ८.१५ टक्के करण्याचा ईपीएफओचा प्रस्ताव होता. केंद्र सरकारनं प्रत्येक सदस्याच्या खात्यावर ८.१५ टक्के दरानं व्याज जमा करण्यास मंजुरी दिली आहे, असं ईपीएफओच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
मागील वर्षी व्याजाची रक्कम खात्यावर जमा होण्यास विलंब लागला होता. मात्र, यंदा तसं होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. कर्मचारी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन याविषयी अधिक माहिती मिळवता येणार आहे. यासाठी ई-पासबुक पर्यायावर क्लिक करावं लागेल.
पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तुम्हाला चार प्रकारे तपासता येते. उमंग अॅप, ई-सेवा पोर्टल, मिस्ड कॉल देऊन आणि एसएमएस पाठवूनही शिल्लक रकमेची माहिती घेता येते. नोंदणीकृत क्रमांकावरून ९९६६०४४४२५ वर मिस्ड कॉल द्या आणि काही सेकंदांनंतर तुमच्या मोबाइलवर EPF खात्यातील शिल्लक येईल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदानं देणं पगारदार कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचं आहे. त्याचबरोबर, कंपन्यांनाही या खात्यात योगदानं देणं बंधनकारक असतं. एक कर्मचारी महिन्याला त्याच्या पगारातील १२ टक्के रक्कम ईपीएफमध्ये देतो. कर्मचाऱ्यांचं संपूर्ण योगदान ईपीएफ खात्यात जमा केलं जातं. कंपनीच्या योगदानापैकी फक्त ३.६७ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. उर्वरित ८.३३ टक्के कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये जाते.
संबंधित बातम्या