मराठी बातम्या  /  बिझनेस  /  शेअर बाजारातून केलेली कमाई EPFO पुन्हा तिथंच गुंतवणार; PF खातेधारकांवर होणार थेट परिणाम

शेअर बाजारातून केलेली कमाई EPFO पुन्हा तिथंच गुंतवणार; PF खातेधारकांवर होणार थेट परिणाम

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 04, 2023 07:23 PM IST

EPFO Investment News : ईटीएफवरील गुंतवणुकीतून मिळणारा नफा पुन्हा शेअर बाजारात गुंतवण्यासाठी केंद्र सरकारनं ईपीएफओला परवानगी दिली आहे.

EPFO
EPFO

EPFO Investment News : देशातील सुमारे साडेसहा कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून ईपीएफओला होणारा नफा पुन्हा शेअर बाजारात गुंतवण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. त्याचा थेट फायदा पीएफ खातेधारकांना होण्याची शक्यता आहे. अर्थात, ही गुंतवणूक ठराविक मर्यादेतच करता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सुमारे साडसेहा कोटी पीएफ खातेधारकांच्या गुंतवणुकीतील काही रक्कम EPFO एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवतो. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही रक्कम ईपीएफओच्या एकूण उत्पन्नाच्या ५ ते १५ टक्क्यांदरम्यान असते. ३१ जुलै २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, या गुंतवणुकीचं मूल्य २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

बिझनेस लाइननं दिलेल्या वृत्तानुसार, २४ ऑगस्ट २०२३ पासून मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आणखी एक कलम जोडण्यात आलं आहे. त्यानुसार, ईपीएफओ आता ​​शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करू शकणार आहे. ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाईल, त्या कंपन्यांचं बाजार मूल्य ५ हजार कोटी किंवा त्याहून अधिक असणं आवश्यक आहे.

EPFO ​​शेअर बाजारात एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) द्वारे गुंतवणूक करते. या गुंतवणुकीतून मिळणारा नफा रिडम्पशनच्या श्रेणीमध्ये ठेवला जातो. ईपीएफओला ही कमाई शेअर बाजारात पुन्हा गुंतवायची होती. सरकारकडून त्यासाठी परवानगी मिळाली आहे. या गुंतवणुकीतून होणाऱ्या नफ्याच्या आधारे पीएफ खातेधारकांचे व्याजदर निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.

व्याजावर कसा होतो परिणाम?

EPFO ​​पीएफ खातेधारकाच्या खात्यात जमा केलेली रक्कम वेगवेगळ्या प्रकारे गुंतवते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग पीएफ खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी पीएफवर ८.१५ टक्के व्याज देण्यात आलं होतं.

ईटीएफमध्ये किती गुंतवणूक?

EPFO नं चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै या कालावधीत ईटीएफमध्ये १३,०१७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये हाच आकडा ५३,०८१ कोटी रुपये होता. ईपीएफओनं ईटीएफमध्ये आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४३,५६८ कोटी तर २०२०-२१ मध्ये ३२,०७१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ३१,५०१ कोटी आणि २०१८-१९ मध्ये २७,९७४ कोटी रुपये गुंतवले.

WhatsApp channel